Jyotiraditya Scindia | (Photo Credit: Facebook)

Political Journey Of Scindia Family Of Gwalior: मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते भाजमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. ज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्याने मध्य प्रदेशच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात नेहमीच प्रभावी राहीलेल्या ग्वाल्हेरच्या या शिंदे (Shinde) अलिकडील सिंधिया कुटुंब (Scindia Family) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मूळ मराठी (Marathi) असलेल्या या मराठी कुटुंबाच्या (Marathi Family) अर्थातच विजयाराजे सिंधिया (शिंदे) (Vijaya Raje Scindia) ते आजचे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यापर्यंतच्या राजकीय वाटचालीबद्धल या काही महत्त्वाच्या गोष्टी.

शिंदे घराण्याबाबत थोडक्यात

मध्यप्रदेशच्या राजकारणात प्रभावी असलेले सिंधिया घराणे म्हणजे मूळचे शिंदे घराणे. पूर्वी ग्वाल्हेर हे संस्थान होते. राणोजी शिंदे हे ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे संस्थापक. राणोजी शिंदे यांच्याहीपेक्षा महादजी शिंदे हे अधिक प्रसिद्ध पावले नावारुपाला आले. महादजी हे राणोजी यांचे सर्वात धाकडे चिरंजीव. राणोजी इ.स १७५० मध्ये मृत्यू पावले, तर महादजी शिंदे इ.स. १७६१ मध्ये सत्तेवर आले. त्यांच्यापासून पुढे ग्वाल्हेर संस्थानात शिंदे घराण्याचा दबदबा वाढत गेला. ग्वाल्हेर संस्थानावर राज्य केलेले शिंदे घराण्यातील शासक खालीलप्रमाणे : (संदर्भ विकीपीडीया)

    • जयाप्पाराव (इ.स १७५०-१७६१)
    • महादजी शिंदे (इ.स. १७६१-१७९४)
    • दौलतराव (इ.स. १७९४-१८४३)
    • बायजाबाई (दौलतरावांची विधवा पत्‍नी, इ.स. १८२७-१८३३)
    • जनकोजी (इ.स. १८८६-१९२५)
    • जयाजीराव (इ.स. १८४३-१८८६)
    • माधवराव (इ.स. १८८६-१९२५)
    • जिवाजीराव (इ.स. १९२५-१९४८).

माधवराव शिंदे व ज्योतिरादित्य सिंधीया ही शिंदे कुटुंबातीलच घराणी

दरम्यान, आजच्या स्वतंत्र भारतीय प्रजासत्ताकात वावरणारी माधवराव शिंदे व ज्योतिरादित्य शिंदे राजकारणी याच घराण्यातील आहेत. ग्वाल्हेर संस्थानाचे अखेरचे संस्थानिक जिवाजीराव हे माधवराव शिंद्यांचे वडील होत.

विजयाराजे सिंधिया (शिंदे) (Vijaya Raje Scindia)

राजमाता विजयाराजे यांच्या रुपात शिंदे (आजचे सिंधिया) कुटुंबातील पहिली व्यक्ती भारतीय प्रजासत्ताकातील राजकारणात आली. विजयराजे सिंधिया यांनी 1957 मध्ये काँग्रेस पक्षातून आपली राजकीय वाटचाल सुरु केली. त्यांनी गुना लोकसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढवली आणि त्या खासदार झाल्या. पण, पुढच्या 10 वर्षांत त्यांचे काँग्रेससोबत बिनसले आणि 1967 मध्ये त्यांनी जनसंघात प्रवेश केला. विजयराजे यांच्यामुळे जनसंघ ग्वालियर संस्थान (पूर्वीचे) भक्कम झाला. त्यामुळे 1971 मध्ये इंदिरा गांधी यांची लाट असतानाही जनसंघाने ग्वालियर (ग्वाल्हेर) येथून तीन जागा जिंकल्या. हे तीन उमेदवार होते स्वत: विजयाराजे सिंधिया (भिंड) अटल बिहारी वाजपेयी (ग्वालियर) आणि विजयाराजे सिंधिया यांचे चिरंजीव आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वडील माधवराव सिंधिया गुना येथून निवडणूक जिंकले.

माधव राव सिंधिया (Madhavrao Scindia)

माधवर राव सिंधिया हे आपल्या आईवडीलांचे एकूलते एक पूत्र होते. त्यांना चार बहिणी होत्या. विशेष म्हणजे माधवराव सिंधिया हे केवळ वयाच्या 26 व्या वर्षी खासदार झाले होते. पण, ते जनसंघात फार काळ रमले नाहीत. 1977 मध्ये लागलेल्या अणीबाणीनंतर त्यांनी आपली आई विजयाराजे सिंधिया आणि जनसंघापासून फारकत घेतली. 1980 ची निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर लढली आणि जिंकलीही. त्यानंतर माधवराव हे केंद्रात मंत्री बनले. मात्र 2001 मध्ये एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे पूत्र ज्योतिरादित्य सिंधिया हे राजकारणात आले.

वसुंधरा राजे सिंधिया (Vasundhara Raje)

वसुंधरा राजे सिंधिया या राजस्थानच्या राजकारणात प्रभावी आहेत. त्याही ग्वाल्हेरच्या शिंदे कुटंबातीलच. वसुंधरा या विजयाराजे यांच्या कन्या. वसुंधरा आणि यशोधरा राजे सिंधिया यो दोघीही राजकारणात आहेत. वसुंधरा राजे या 1984 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारीणीमध्ये सहभागी झाल्या. त्या अनेक वेळा राजस्थानच्या मुख्यमंत्रीही झाल्या आहेत.

यशोधरा राजे सिंधिया (Yashodhara Raje Scindia)

वसुंधरा राजे सिंधिया यांची बहिण यशोधरा राजे सिंधिया यासुद्धा राजकारणात आहेत. पण, त्या तितक्याशा कार्यरत नाहीत. यशोधरा या 1977 मध्ये अमेरिकेला गेल्या. त्यांना राजकारणात विशेष रुची नव्हती. त्यांना तीन मुले आहेत. यशोधरा राजे या 1994 मध्ये भारतात परतल्या. आपल्या आईच्या आग्रहापोटी त्यांनी भाजपची सदस्यता स्वीकारली आणि 1998 ममध्ये त्यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूकही लढवली. त्या पाच वेळा आमदार राहिल्या. तसेच, शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात यशोधरा या मंत्रीही राहिल्या आहेत.

ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia)

काँग्रेस नेते माधवराव सिंधिया यांचे 2001 मध्ये विमान अपघातात निधन झाले. तेव्हापासून ज्योतिरादित्य सिंधिया हेच आपल्या वडीलांचा राजकीय वारसा पुढे चालवत आहेत. वडीलांप्रमाणेच ज्योतिरादित्य हेसुद्धा काँग्रेसमधील एक तकडे नेते होते. नुकताच त्यांनी काँग्रेस पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. (ते भाजप प्रवेश करतील अशी चर्चा आहे.) माधवराव यांच्या निधनानंर झालेल्या पोटनिवडणुकीत ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 2002 मध्ये गुना येथून काँग्रेस तिकीटावर विजय मिळवला. तेव्हापासून ज्योतिरादित्य सिंधिया हे एकही निवडणूक पराभूत झाले नाहीत. अपवाद केवळ 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचा. एकेकाळी ज्योतिरादित्य सिंधिया यांचे सहकारी राहिलेल्या कृष्ण पाल सिंह यादव यांनी सिंधिया यांना पराभूत केले. त्यानंतर काँग्रेस पक्षात सातत्याने चर्चेत राहिलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 10 मार्च 2020 या दिवशी काँग्रेस पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला.

दरम्यान, ग्वालियर (ग्वाल्हेर) घराण्याशी संबंधीत असलेल्या वसुंधरा राजे सिंधिया यांचे चिरंजीव दुष्यंत हेसुद्धा राजकारणात आहेत. ते सध्या भाजपमध्ये आहेत. राजस्थान राज्यातील झालवाड लोकसभा मतदारसंघातून ते भाजप तिकीटावर निवडूण आले आहेत.