उर्मिला मातोंडकर राजकारणात कशा आल्या? त्यांनी काँग्रेस पक्षच का स्वीकारला?
Congress candidate actress Urmila Matondkar | Photo credit: Facebook pg / realurmilamatondkar

Lok Sabha Elections 2019: उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ (Mumbai North Lok Sabha constituency) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांना काँग्रेस (Congress) पक्षाने या मतदारसंघातून दिलेली उमेदवारी हा या चर्चेचा विषय. उर्मिला मातोंडकर यांची राजकारणात एण्ट्री आणि अवघ्या काही तासातच थेट लोकसभा निवडणूक उमेदवारी. 'राजकारणात काहीही होऊ शकतं' या टिपीकल वाक्याला आणि त्याच्या समर्थकांना साजेसंच असं काहीसं हे. काँग्रेसने मातोंडकर यांची उमेदवारी जाहीर केली आणि आता पर्यंत भाजप पर्यायाने उमेदवार गोपाळ शट्टी (Gopal Shetty) यांच्यासाठी एकतर्फी असलेली ही लढाई सुरुवातीला 'काट्याची टक्कर' आणि आता 'आव्हान' अशा प्रकारात बदलली. मातोंडकर यांच्या राजकारण प्रवेशाने त्यातही त्यांच्या उमेदवारीने राजकीय वर्तुळ आणि सर्व सामान्यांमध्ये चर्चा आणि कुतूहल निर्माण झाले. ते होणे स्वाभाविकही होते. त्यामुळे या कुतुहलाचे काही अंशी तरी का होईना निराकरण करायचे तर, उर्मिला मातोंडकर यांचा राजकारणात प्रवेश कसा झाला आणि त्यांनी त्यासाठी काँग्रेस हा पक्षच का निवडला? हा जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

उर्मिला मातोंडकर यांच्या बालपणाविषयी थोडक्यात

आज जरी उर्मिला मातोंडकर एक यशस्वी अभिनेत्री, सेलिब्रिटी, चर्चित चेहरा आणि आता राजकारणी वैगेरे वैगेरे असे सर्व काही दिसत, वाटत असल्या तरी त्या सर्वसामान्यच आहेत. मूळच्या मुंबईकर असलेल्या मातोंडकर या अस्सल मराठी आहेत. त्यांच्या बालपणीची जडणघडण ही मुंबई आणि मराठी वातावरणातच झाली. त्यांचे वडील श्रीकांत मातोंडकर हे बँक कर्मचारी होते. ग्रीन्डलेज बँकेत काम करायचे ते. त्यांना एक भाऊ आहे. केदार. जो इंडियन एअरफोर्समध्ये आहे.

अभिनय कारकीर्द

बालपणी अत्यंत लाजाळू काहीशा घाबरट अशा मातोंडकरांना लहानपणीच बाल कलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी मराठीतील अभिनयसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्या यांच्या 'झाकोळ' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. ते साल होतं 1980. पुढे त्यांनी श्याम बेनेगल यांच्या कलयुग आणि शेखर कपूर यांच्या 'मासूम' चित्रपटात काम केलं आणि अभिनयातील त्यांच्या यशाचा आलेख वाढतच गेला. राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शित 1995, 1997 या सालांमध्ये आलेला अनुक्रमे 'रंगीला' आणि 'सत्या' या चित्रपटाने त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. मात्र, यशाची हवा डोक्यात न जाऊ देता वेगवेगळ्या धाटनिच्या भूमिका त्या विविध चित्रपटांतून साकारत गेल्या. त्यांनी तामीळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप उमेदवार संपूर्ण यादी)

Congress candidate actress Urmila Matondkar | Photo credit: Facebook pg / realurmilamatondkar

बाल कलाकार म्हणून अभिनयाला प्रारंभ

उर्मिला मातोंडकर यांनी बालअभिनेत्री म्हणून 1980 साली श्रीराम लागूंच्या 'झाकोळ'मध्ये पहिल्यांदा काम केलं होतं. त्यानंतर श्याम बेनेगल यांच्या कलयुग आणि शेखर कपूर यांच्या 'मासूम'मध्येही त्यांनी काम केलं होतं. 'वार परिवार', 'चक धूम धूम' आणि 'डान्स महाराष्ट्र डान्स' अशा रिअॅलिटी शोजच्या होस्ट आणि जज म्हणूनही काम पाहिलं आहे. मात्र, यशाचा आलेख वाढत आणि विस्तारत असतानाही उर्मिला मातोंडकर यांनी 2005 पासून चित्रपटापट सृष्टीपासून स्वत:ला काहीसं दूर ठेवणंच पसंद केलं. (हेही वाचा, आयकर खात्याचा छापा, चार वेळा बदलला पक्ष; अशी आहे जयाप्रदा यांची राजकीय कारकीर्द)

समाजसेवेच्या कौटुंबीक पार्श्वभूमिमुळे ओळख सेलिब्रिटी चेहऱ्यापलीकडे

उर्मिला मातोंडकर यांना समाज, समाजसेवा, सामाजिक चळवळ आंदोलन या सर्वांची ओळख नव्याने करुन घ्यावी लागली नाही. ते बाळकडू त्यांना घरातूनच मिलाले. ग्रीन्डलेज बँकेत कर्मचारी असलेले उर्मिलाचे वडील श्रीकांत मातोंडकर हे कामगार नेते होते. बँकेतील तृथिय आणि चथुर्थ श्रेणी कामगारांच्या संघटनांचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. कालांतराने ग्रीन्डलेज बँकेचे स्टँडर्ड चार्टर्ड बँकेत विलीनीकरण झाले. पुढे श्रीकांत मातोंडर यांनीही स्वेच्छानिवृत्ती घेतली. यात महत्त्वाचा उल्लेख करावा लागेल तो म्हणजे, श्रीकांत मातोंडकर हे केवळ कामगारांचे नेते नव्हते. तर, ते राष्ट्र सेवा दलाशीही संबंधीत होते. राष्ट्र सेवा दल आणि त्यातील मंडळींचा आपल्यावर मोठा प्रभाव असल्याचे उर्मिला अनेकदा सांगते. त्या काळी राजकारण आणि समाजकारणात मोठे कार्य आणि वलय असलेल्या मृणाल गोरे आणि त्यांच्योसबतच राष्ट्र सेवा दलातील अनेक दिग्गजांसोब श्रीकांत मातोंडकर काम करत. त्यामुळे सहाजिकच त्या काळात अनेक दिग्गजांचे उर्मिला मातोंडकर यांच्या विडलांसोबत बसणे उठणे असे. अनेक दिग्गज त्यांच्या घरीही येत. त्यामुळे त्यांच्यात चालणारे विषय, संवाद, वाद विवाद हे नकळत छोट्या उर्मिलाच्या कानावर पडत असत. त्यात श्रीकांत मातोंडकरांनी इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणी विरुद्ध भूमिका घेतली होती. त्यामुळे त्या काळात सरकार विरोधी विद्रोहात ते देखील सहभागी होते. या सर्वांचा परिणाम उर्मलावर झाला नसता तरच नवल. अनेकदा मुलाखतींमध्ये विचारलेला प्रश्नाला उत्तर देताना स्वत: उर्मिला आणि मातोंडकर कुटुंबाला जवळून ओळखणारे अनेक लोक त्याबाबत विस्ताराने सांगतात.

अनेक राजकीय पक्षांकडून ऑफर

अनेकांना उत्सुकता आहे की, उर्मिला मातोंडकर यांचा राजकारणात नेमका प्रवास कसा झाला? या प्रश्नाचे उत्तर घ्यायचे तर, स्वत: उर्मिला मातोंडकर यांनीच त्याबाबत एका मुलाखतीत सांगितले आहे. 'मॅक्स महाराष्ट्र' या YouYube Channel उर्मिला मातोंडकर यांनी मुलाखत दिली. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्या सांतात, 'खरं म्हणजे मला माझं खासगी आयुष्य जपायला आवडतं. मला कोणाच्याही खासगी आयुष्यात डोकावायला आवडत नाही. मी जे काही समाजकार्य किंवा छोट्यामोठ्या गोष्टी माझ्या परीने, माझ्या पातळीवर करत असते, त्याचे जाहीर प्रदर्शन मला आवडत नाही. त्यामुळेच तर मी आतापर्यंत केलेल्या कामाला प्रसिद्धी दिली नाही. पण, राजकीय आणि सामाजिक वर्तुळातील बऱ्याच लोकांना माझे काम माहिती होते. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांकडून गेली अनेक वर्षे मला राजकारणात प्रवेश करण्यासाठी ऑफर होत्या. परंतू, थेट राजकारणात जावे असे मला कधी वाटले नव्हते. पण, आता मी राजकारणात आले आहे.'

Congress candidate actress Urmila Matondkar | Photo credit: Facebook pg / realurmilamatondkar

उर्मिला मातोंडकर यांचा राजकारण प्रवेश काँग्रेस पक्षाचीच निवड का?

आपण इतकी वर्षे राजकारणापासून दूर होता. आताच राजकारणात का यावेसे वाटले आणि त्यासाठी काँग्रेस पक्षाचीच निवड का? हा प्रवास कसा झाला असे विचारले असता. गेली चार साडेचार वर्षे देशात जे चालले आहे ते बरे नाही. सत्तेवर असलेला पक्ष (भाजप) हा प्रचंड ध्रुविकरणाचे राजकारण करत आहे. त्या विरोधात उभे राहायला हवे. आज लोकांसोमर प्रचंड प्रश्न आहेत. प्रचंड प्रमाणात काम करायला हवे. हे काम करायचे तर आपल्या विचारांशी सुसंगत पक्ष असायला हवा. मी ज्या विचारांत वाढले त्या विचारांशी समांतर असा काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, असे उर्मिला मातोंडकर यां सांगतात.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ हा खरे तर भारतीय जनता पक्षाचा अलिकडील काळातील बालेकिल्ला. 1952 ते 1984 या काळात हा मतदारसंग काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा गड होता. श्रीपाद अमृत डांगे, मृणाल गोरे अशा दिग्गजांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, 1989 मध्ये भाजपने राम नाईक यांच्या रुपात भाजप उमेदवार येथे निवडूण आला आणि या मतदारसंघात भाजपची पाळंमुळं घट्ट रोवली गेली. 1989 ते 2004 पर्यंत राम नाईक हे येथून सलग विजयी होत आले. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत अभिनेता गोविंदा अहुजा यांना काँग्रेस पक्षाने राम नाईक यांच्या विरोधात मैदानात उतरवले आणि अपवाद घडला. विरारका छोरा असे कँम्पेन राबवलेल्या अभिनेता गोविंदा याने राम नाईक यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पुढे 2009 ते 2014 या काळा संजय निरुपम यांच्या रुपात काँग्रेसने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे राखला. मात्र, 2014 मध्ये आलेल्या काँग्रेस विरोधी लाटेत मतदारांनी भाजप उमेदवाराच्या बाजून कौल दिला. भाजपचे गोपाळ शेट्टी हे विजयी झाले.

गोपाळ शेट्टी विरुद्ध उर्मिला मातोंडकर काट्याची टक्कर

आता लोकसभा निवडणूक 2019 मध्येही भाजपने विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनाच मैदानात उतरवले आहे. काँग्रेसने खेळी करत उर्मिला मातोंडकर यांच्या रुपाने एक वलयांकीत चेहरा आणि सोज्वळ प्रतिमा असलेला उमेदवार मैदानात उतरवला आहे. त्यामुळे आता पर्यंत भाजप पर्यायाने उमेदवार गोपाळ शट्टी यांच्यासाठी एकतर्फी असलेली ही लढाई सुरुवातीला 'काट्याची टक्कर' आणि आता 'आव्हान' अशा प्रकारात बदलली आहे, असे स्थानिक लोक सांगतात. आता केवळ हेच पाहायचे की, मतदार नेमका काय निर्णय घेतात.