तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळी, बंगाली, मराठी व हिंदी अशा अनेक भाषेतील चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री जयाप्रदा (Jaya Prada) यांचा आज वाढदिवस. जयाप्रदा यांचा जन्म 3 एप्रिल 1962 साली आंध्रप्रदेश राज्यातील राजमंड्री येथे झाला. जयाप्रदा यांचे खरे नाव ललिता राणी होते. जयाप्रदा यांचे वडील कृष्णा हे एक तेलुगू फ़िल्म फायनान्शियर होते, त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या घरात फिल्मी वातावरण होते. त्यांच्या आई नीलवाणी यांनी त्यांना नृत्य आणि संगीताचे धडे दिले, त्यामुळे वयाच्या 14 व्या वर्षी त्यांना पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली.
सरगम हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट. हा चित्रपट आणि यातील गाणी अतिशय लोकप्रिय ठरली होती. या चित्रपटामुळे जयाप्रदा रातोरात स्टार बनल्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा आपला मोर्चा तेलुगु चित्रपटांकडे वळवला. काही वर्षांनी त्यांचा सुपरहिट ‘तोफा’ प्रदर्शित झाला. त्यानंतर मात्र त्यांनी बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. 80 च्या दशकात त्यांनी अनेक अभिनेत्रींना टक्कर दिली होती. याच कारणामुळे हेमा मालिनी आणि श्रीदेवी यांच्यासारख्या अभिनेत्रीसुद्धा त्यांच्यासोबत काम करायला सहजा-सहजी तयार व्हायच्या नाहीत. इतर अभिनेत्रींच्या तुलनेत जया प्रदा यांचे मानधन अधिक असायचे. यामुळेच त्यांच्या घरावर आयकर खात्याने छापा टाकला होता. त्याकाळात निर्माते श्रीकांत नहाटा यांनी जयाप्रदा यांना बरीच मदत केली. पुढे दोघांनी लग्नही केले, मात्र श्रीकांत यांचे आधीच एक लग्न झाले असल्याने जयाप्रदा व श्रीकांत एकत्र राहू शकले नाहीत.
त्यानंतर 1994 साली जयाप्रदा यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरवात एन. टी. रामराव यांच्या 'तेलगू देशम पार्टी' (TDP) तून केली. एन.टी.आर यांच्या मृत्यूनंतर एन. चंद्रबाबू नायडू यांच्यासोबतचे संबध बिघडल्यानंतर त्यांनी टीडीपीला रामराम ठोकला.
पुढे त्या 'समाजवादी पक्षात' सामील झाल्या. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत जयाप्रदा रामपूरमधून 85,000 मतांनी निवडून आल्या आणि लोकसभेत पोहोचल्या. त्यानंतर 2009 सालच्या प्रचारावेळी, रामपूर येथील महिलांना टिकल्या वाटून आचारसंहितेचा भंग केल्याने निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवली होती. दरम्यान आझम खान हे आपले नग्न फोटो लोकांना वाटत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्या निवडणुकीत जयाप्रदा 30,000 मतांनी निवडून आल्या होत्या. (हेही वाचा: Lok Sabha Elections 2019: अभिनेत्री जयाप्रदा यांचा भाजप पक्षात प्रवेश)
मुलायमसिंह यांच्यासोबत झालेल्या वादानंतर जयाप्रदा आणि त्यांचे सहकारी अमर सिंह यांची समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर दोघांनी राष्ट्रीय लोकदलात (RLD) प्रवेश केला. 2014 मध्येही बिजनौरमधून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या, मात्र भाजपकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला होता.
त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी भाजप (BJP) मध्ये प्रवेश केला. उत्तर प्रदेशातील रामपूर मतदारसंघातून जयाप्रदा समाजवादी पक्षाचे उमेदवार आझम खान यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत.