बेगुसराय लोकसभा मतदारसंघ: गिरिराज सिंह यांना कन्हैया कुमार यांचे आव्हान, सत्ता विरुद्ध युवानेता थेट संघर्ष
Giriraj Singh, Kanhaiya Kumar, Tanvir Hasan | (Photo Credit: Facebook)

Lok Sabha Elections 2019: बेगुसराय लोकसभा मतदारसंघ (Begusarai Lok Sabha Constituency) राष्ट्रीय पातळीवर जोरदार चर्चेत आहे. जगभरातील अनेक विचारवंत, अभ्यासक आणि खास करुन राजकीय घडामोडींचा अभ्यास करणारे विश्लेषकही या मतदारसंघात तळ ठोकून आहेत. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) उमेदवार कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar), भाजप (BJP) उमेदवार केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह ( Giriraj Singh) आणि राष्ट्रीय जनता दल (Rashtriya Janata Dal)उमेदवार तनवीर हसन (Tanvir Hasan) या मतदारसंघातून रिंगणात आहेत. काही अपक्षही येथे नशिब अजमावत आहेत. मात्र, थेट सामना कन्हैया कुमार आणि गिरिराज सिंह यांच्यात होईल असे चित्र आहे.

गिरिराज सिंह इच्छा नसतानाही बेगुसरायमध्ये

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना भाजपने या मतदारसंघातून उमेदवारी दिली असली तरी, ती त्यांनी स्वत:हून स्वीकारलेली नाही. भाजपच्या केंद्रीय मंडळाने तिकिटवाटपात बहुतांश मंत्र्यांना तिकीट देत उमेदवारी कायम राखली. गिरिराज सिंह यांचीही उमेदवारी भाजपने कायम ठेवली. मात्र, त्यांचा लोकसभा मतदारसंघ बदलण्यात आला. 2009 ते 2014 आणि 2014 ते 2019 या दोन टर्मसाठी गिरिराज सिंह हे नवादा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून संसदेत पोहोचले. या वेळी मात्र, भाजपने त्यांचा मतदारसंघ बदलला. त्यामुळे गिरिराजसिंह यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत बिहारमधीलकोणत्यातच मंत्र्याची उमेदवारी बदलली नाही. तर, मग माझाच मतदारसंघ का बदलला, असे म्हणत आपली नाराजी जाहीरपण व्यक्त केली. पक्षनेतृत्वाने समजूत काढल्यानंतर गिरिराजसिंह या मतदारसंघातून लढण्यास तयार झाले. केंद्रातील सत्ता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचारकी चेहरा आणि राष्ट्रीय पक्ष असलेल्या सत्ताधारी भाजपचे पाठबळ ही गिरिराज सिंह यांची जमेची बाजू आहे.

Giriraj Singh | (Photo Credit: Facebook)

कन्हैया कुमार विद्यार्थी नेता ते युवानेता

ऑल इंडिया स्टूडंट फेडरेशन (AISF) या संघटनेचा नेता ते भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) उमेदवार हा कन्हैया कुमार याचा संघर्ष मोठा रंजक आहे. राज्यशास्त्र विषयात पीएचडी करण्यासाठी जवाहरलाल नेहरुन विद्यापीठात (JNU) प्रवेश घेतलेला कन्हैया तसा संशोधक विद्यार्थी. मात्र, जेएनयू (JNU) मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप झाला आणि कन्हैया कुमार चर्चेत आला. या कार्यक्रामाचे आयोजन आणि कथीत घोषणा यांमुळे कन्हैया कुमार याच्यावर देशद्रोह केल्याचा आरोपही ठेवण्यात आला. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.

Kanhaiya Kumar | (Photo Credit: Facebook)

दरम्यान कन्हैया कुमार यांना भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI)ने बेगुसराय लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक 2019 साठी रिंगणात उतरवले. तडाकेबंद आणि तितकेच अभ्यासपूर्ण भाषण, तत्वज्ञान, विनोद आणि कोणत्याही प्रकारे असंसदीय शब्दाचा वापर कटाक्षाने टाळणे ही कन्हैयाच्या भाषणाची वैशिष्ट्ये आहेत. कन्हैया आपल्या भाषणातून हिंदी आणि स्थानिक भाषेत मतदारांशी संवाद साधतो. त्याला मिळणारा लोकांचा प्रतिसादही प्रचंड आहे. अर्थात, बेगुसराय हा CPIचा गड असल्याचे एकेकाळी मानले जात असे. मात्र, गेल्या काही वर्षात या गडाला धक्का लागला आहे. कन्हैयाच्या रुपात सीपीआय हा गड परत मिळवते का याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप उमेदवार संपूर्ण यादी)

तनवीर हसन

Tanvir Hassan | (File Photo)

लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार तनवीर हसन हेसुद्धा बेगुसराय येथून नशिब आजमावत आहेत. 2014 मध्ये भाजपच्या भोला सिंह यांनी मताधिक्याने विजय मिळवला होता. मात्र, त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविण्यास तनवीर हसन यशस्वी ठरले होते. आता कन्हैया कुमार यांच्या उमेदवारीमुळे मतविभागणीचा अधिक धोका तनवीर हसन यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तनवीर हसन यांची उमेदवारी मागे घेत राष्ट्रीय जनता दलाने कन्हैया कुमार यांना पाठिंबा द्याव अशी विनंती सीपीआयने तेजस्वी यादव यांना केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्याकडून सीपीआयची विनंती आणि तनवीर हसन यांची उमेदवारी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आली नाही. दरम्यान, बेगुसराय लोकसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार याबाबत जोरदार उत्सुकता आहे.