marathi langauage

Vishwa Marathi Sahitya Sammelan 2025: मराठी भाषेचे संवर्धन व जगभर प्रसार व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे भाषा विभागातर्फे येत्या 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 या कालावधीत पुण्यातील (Pune) फर्ग्युसन महाविद्यालयात विश्व मराठी संमेलनाचे (Vishwa Marathi Sahitya Sammelan) आयोजन करण्यात आले आहे. अभिजात मराठी ही या विश्व मराठी संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना असून त्याअनुषंगाने या कालावधीत विविध भाषा विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. या संमेलनात मराठी संस्कृती व मराठी भाषा यांचेबाबत चर्चासत्र, मराठी संस्कृतीचे प्रदर्शन करणारे नाट्यसंगीत, वादन इ. विविध कलांचा अविष्कार त्याचप्रमाणे विविध चर्चासत्रांचे आयोजन केले जाणार आहे.

महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही मराठी भाषा जपणारे नागरिक आहेत. भाषा जिवंत ठेवण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांना एकत्र येता यावे, या उद्देशाने विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे पहिले विश्व मराठी संमेलन पुणे येथे होत आहे. याआधी मुंबई व त्यानंतर वाशी अशा दोन ठिकाणी विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आता पुणे येथे हे संमेलन 31 जानेवारी, 1 आणि 2 फेब्रुवारी 2025 असे तीन दिवस फर्ग्युसन महाविद्यालय येथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या साहित्य संमेलनात मराठीसाठी मोठे योगदान दिलेले एक ज्येष्ठ साहित्यिक त्याचबरोबर एक नवीन लेखकाचा देखील सन्मान करण्यात येणार आहे. त्याशिवाय मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी हातभार लावलेल्या सर्व समित्यांचा, त्यातील साहित्यिकांचाही सन्मान करण्यात येणार आहे. या संमेलनात बाल साहित्यापासून, महिला, युवक, वृद्ध अशा सर्वांनाच समाविष्ट करण्याचा प्रयत्न आहे. तसेच मराठीसाठी योगदान दिलेले परंतु, काही कारणामुळे ते पुढे येऊ शकले नाहीत अशांनाही या संमेलनात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. (हेही वाचा: Marathi Classical Language: मराठी भाषा अभिजात म्हणून मान्य; बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी या भाषांनाही तोच दर्जा)

संतसाहित्य, अभंगवाणी, लोककला, महिला साहित्य, बालसाहित्य, मराठीतील आधुनिक प्रवाह, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक गीतांवर आधारित गीते, भावगीते आणि आधुनिक गीते अशा विविध टप्प्यातील सांस्कृतिक कार्यक्रम आदींवर भर देण्यात येणार आहे. फर्ग्युसन महाविद्यालयातील भव्य प्रेक्षागृहात युवा पिढीसह विविध नाविन्यपूर्ण संकल्पनांवर कार्यक्रम आयोजित करता येतील. वाचन संस्कृतीला चालना द्यावी यासाठी पुस्तकांच्या 100 स्टॉलचे नियोजन करण्यात आले असून त्याहून अधिक स्टॉल लावण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. यामध्ये प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि संस्था यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन राज्य मराठी विकास संस्थेमार्फत करण्यात आले आहे.