अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती (SC/ST) यांना दिले जाणारे लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील आरक्षण (SC/ST Reservation in Lok Sabha, Vidhan Sabha Elections) रद्द करण्यात यावे असे वंचित बहुजन आघाडी संघटक अॅड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी म्हटले आहे. ही मागणी करत असताना आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेण्याची हिंमत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये नाही असा टोलाही आंबेडकर यांनी लगावला. ते भोपाळ येथे बोलत होते. आंबेडकर यांनी या वेळी सांगितले की, मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उतरवणार आहे.

अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भोपाळ येथे एका वृत्तसंस्थेशी बोलताना मंगळवारी सांगितले की, भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षणाची तरतूद केवळ 10 वर्षांसाठी होती. मात्र, त्याबाबतची व्यख्या चुकीच करण्यात आली. दहवा वर्षांची आरक्षणाची तरतूद ही केवळ राजकीय घटनात्मक आरक्षणासाठी होती. जी लोकसभा आणि विधानसभेसाठी होती. बाबासाहेबांनी सांगितले होते की, जर आवश्यकता नसेल तर आरक्षण रद्द करण्यात यावे. (हेही वाचा, धक्कादायक! प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या वृद्धास जबर मारहाण; पहा व्हिडीओ)

प्रकाश आंबेडकर यांनी पुढे बोलताना सांगितले की, लोकांनी मतदानाच्या अधिकाराचा स्वीकार केला आहे. त्याच्या माध्यमातून लोक आरक्षीत जागेवर मतदान करतात. त्यामुळे संविधानाचा हेतू सफल झाला. अनेक लोक आरक्षण बंद करण्याची मागणी करतात. परंतू, भाजप असो किंवा काँग्रेस दोन्हीपैकी कोणताच पक्ष आरक्षण संपवण्याची हिंमत दाखवत नाही. आंबेडकर म्हणाले की, मी स्वत: आरक्षणाचा लाभ कधीच घेतला नाही. मी नेहमीच खुल्या मतदारसंघातून लढतो. संविधानामध्ये जो मुलभूत अधिकार दिला आहे तो कायम ठेवायला हवा. गरीबाच्या मुद्द्यावर आरक्षण दिले तर त्याचा अधिक फायदा हा सर्वसामान्य जनतेला मिळू शकेल.