वृद्धास मारहाण (Photo Credit : Youtube)

भारत हा सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे. राज्यघटनेने प्रत्येकाला अभिव्यक्तीस्वातंत्र्य दिले आहे. मात्र सध्याच्या लोकसभा निवडणुकीवेळी याच्या अगदी उलट प्रकार दिसून येत आहे. नुकतेच राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती, हे प्रकरण ताजे असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या वृद्धास प्रकाश आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. सध्या सोशल मिडियावर या गोष्टीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

भाई रजनीकांत असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अकोला येथील रहिवाशी असलेले भाई समाजवादी आणि शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यांनी व्हॉट्सअॅपवर प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल तीन आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या होत्या. याच्या रागातून संतप्त झालेले आंबेडकर समर्थक संतोष कोल्हे यांनी भाई यांना चप्पल, बुटाने मारहाण केली. (हेही वाचा: राज ठाकरे विरोधात अर्वाच्च्य भाषेत लिखाण करणार्‍या विजय वारे यांना मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप)

संतोष कोल्हे हे दर्यापूर नगरपालिकेत नगरसेवक होते. मात्र काही दिवसांपूर्वीच भाजपातून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. आश्चर्य म्हणजे संतोष हे व्यवसायाने वकील आहेत. दर्यापूरच्या चहा टपरीवर ही मारहाण झाली. भाई रजनीकांत हे काही कामानिमित्त  दर्यापूर इथे आले होते. त्यावेळी संतोष कोल्हे यांनी त्यांना एका हाॅटेलमध्ये बोलावून जाब विचारला. या चर्चेचे रुपांतर वादामध्ये झाले आणि 2 ते 3 जणांनी मिळून भाई यांना जबर मारहाण केली.