
2019 संपण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे भारत चंद्रावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे योग्य आरोग्य सेवा प्राप्त करण्यासाठी नागरिक धडपडत आहेत. देशाच्या दुर्गम भागातील लोक अजूनही उपचारांसाठी मोठ्या शहरांवर अवलंबून आहेत. मात्र तिथेही खात्रीलायक सोयी सुविधा उपलब्ध नसतात. त्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट देखील डोकेदुखी ठरत आहे. उत्तर प्रदेशमध्ये (Utter Pradesh) असेच बनावट डॉक्टरांचे (Fake Doctor) धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीने डॉक्टर बनून गेल्या दशकभरात हजारो शस्र्त्रक्रिया केल्या आहेत. या प्रकरणामुळे वैद्यकीय सेवांच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यूपीच्या देवबंद येथील 50 वर्षीय ओम पाल (Om Pal) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीने दहा वर्षाहून अधिक काळ करारावर सामुदायिक आरोग्य केंद्रात (CHC) डॉक्टर म्हणून काम केले आहे. या काळात पाल याने हजारो शस्त्रक्रिया केल्या आहेत. ओम पाल हा कोणत्याही प्रकारचा डॉक्टर नाही, एमबीबीएस पदवीचे मूळ धारक डॉ. राजेश आर यांचा तोतया बनून तो डॉक्टरकी करत होता.
सहारनपूर अधीक्षक पोलिस (एसपी) विद्यासागर मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओम पाल हा, म्हैसूर विद्यापीठाचा माजी विद्यार्थी डॉ. राजेश आर. ओम पाल याच्या एमबीबीएस पदवीवर काम करत होता. सहारनपूर जिल्ह्यात ओम पाल याचे नर्सिंग होम आहे. एक खंडणीचा फोन आल्यानंतर तो स्वत: पोलिसांकडे मदतीसाठी गेला असता, त्याची खरी ओळख उघडकीस आली. एका व्यक्तीने पाल याची खरी ओळख लपवून ठेवण्यासाठी 40 लाख रुपयांची मागणी केली होती. (हेही वाचा: महाराष्ट्रात बोगस डॉक्टरांचं नवं रॅकेट उघड! मागील 4 वर्ष सुमारे 57 जण करत आहेत 'डॉक्टर' म्हणून काम)
ओम पाल मंगलोरमधील हवाई दलाच्या बेस हॉस्पिटलमध्ये पॅरामेडिक म्हणून काम करायचा व त्याला अजूनही पेन्शन मिळते. राजेश आर नावाचा एक डॉक्टर त्याच्याबरोबर मंगलोर येथे कार्यरत होता. डॉ. राजेश आर परदेशात जाण्यापूर्वी ओम पालने त्याच्या डिग्रीवर स्वत:चा फोटो लावून ती डिग्री क्लोन केली. या पदवीच्या आधारे, त्याला देवबंद सीएचसी येथे सर्जनची नोकरी मिळाली. इतकच नाही तर केलेल्या शस्त्रक्रियांसाठी त्याला अनेक प्रमाणपत्रे आणि डिप्लोमादेखील मिळालेलं आहेत, त्यापैकी दोन तर यूएसमधून आहेत.