तिरुपती मंदिर (Tirupati Temples) चालवणारा सर्वात श्रीमंत मंदिर ट्रस्ट, ‘तिरुमाला तिरुपती देवस्थानम’ (TTD) आता प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात तिरुपती मंदिर उभारणार आहे. आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील तिरुपती मंदिर हे भगवान व्यंकटेश्वर स्वामींना समर्पित मुख्य मंदिर आहे. व्यंकटेश्वराला भगवान विष्णूचे रूप मानले जाते. हे मंदिर तिरुपती बालाजीच्या नावाने प्रसिद्ध आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानमने नुकतेच जम्मू आणि काश्मीरमधील जम्मू भागात तिरुपती मंदिर बांधले आहे. त्याचे उद्घाटनही झाले आहे. मात्र, संपूर्ण मंदिर बांधण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. बांधकामाचे काम सुरू आहे. याशिवाय महाराष्ट्रातील नवी मुंबई, गुजरात आणि छत्तीसगडमध्येही तिरुपती मंदिराच्या उभारणीचे काम सुरू आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानमची स्थापना 1933 साली झाली. त्यावेळी हे ट्रस्ट तिरुमला येथील तिरुपती बालाजी मंदिर, तिरुचिनूर येथील श्री पद्मावती अम्मावरी मंदिर आणि तिरुपती येथील श्री गोविंदराजा मंदिर या तीन मंदिरांचे व्यवस्थापन पाहत होते. मात्र, आता देशभरात तिरुपतीची 58 मंदिरे असून त्यांचे व्यवस्थापन हे मंदिर पाहते. यातील बहुतांश मंदिरे आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये आहेत.
तिरुमाला तिरुपती देवस्थानमने सर्वप्रथम आंध्र प्रदेशात मंदिरे बांधणे आणि ताब्यात घेणे सुरू केले. उत्तराखंडमधील बालाजी मंदिर हे त्यांनी प्रदेशाबाहेर व्यवस्थापित केलेले पहिले मंदिर होते. 1969 मध्ये या मंदिराचे व्यवस्थापन टीटीडीने घेतले होते. यानंतर 2019 मध्ये कन्याकुमारीमध्ये भगवान व्यंकटेश्वर मंदिराची स्थापना करण्यात आली.
हे ट्रस्ट सध्या आणखी तीन मंदिरे बांधण्याच्या विचारात आहे. यातील एक गुजरातच्या गांधीनगरमध्ये, दुसरा छत्तीसगडच्या रायपूरमध्ये आणि तिसरा बिहारमध्ये आहे. बिहारमध्ये बालाजीचे मंदिर कोणत्या ठिकाणी बांधले जाणार, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. यासंदर्भात नितीश कुमार यांच्या सरकारशी पहिल्या टप्प्यात चर्चा सुरू आहे.
तिरुमाला तिरुपती देवस्थानमने नुकतीच नवी मुंबईतील तिरुपती बालाजी मंदिराची पायाभरणी केली आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने नवी मुंबई शहरातील प्राइम एरियामध्ये सुमारे 600 कोटी रुपयांची 10 एकर जमीन दिली आहे. तिरुमाला तिरुपती देवस्थानम त्याच्या बांधकामासाठी सुमारे 70 कोटी रुपये खर्च करणार आहे. आता 8 जून 2023 रोजी जम्मूमध्ये एका मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे मंदिर 62 एकर जागेवर बांधले असून ते बांधण्यासाठी सुमारे 25 कोटी रुपये खर्च आला आहे. मंदिरातील मूर्ती ग्रॅनाइटच्या आहेत. आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरातून या मूर्ती आणण्यात आल्या आहेत. हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. (हेही वाचा: Avantika Express Water Leak Videos: पावसात भारतीय रेल्वेचे वाईट हाल; मुंबई-इंदूर अवंतिका एक्स्प्रेसचा एसी डबा लागला गळू, प्रवाशांचा संताप)
जम्मूमध्ये बांधलेले हे मंदिर आंध्र प्रदेशाबाहेरील सहावे बालाजी मंदिर आहे. यापूर्वी तिरुपती तिरुमला देवस्थानने हैदराबाद, चेन्नई, कन्याकुमारी, दिल्ली आणि भुवनेश्वर येथे बालाजी मंदिरे बांधली आहेत. तिरुमलाच्या बालाजी मंदिरात जे विधी पाळले जातात तेच विधी या मंदिरातही पाळले जातील.