पश्चिम रेल्वे (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतातील कोणत्याही रेल्वे स्थानकात (Railway Station) जा, तिथे स्वच्छ वॉशरूम, खाद्य पदार्थांवर घोंघावणाऱ्या माश्या, पिण्याच्या पाण्याच्या नळाजवळ घाण आढळू अगर न आढळू, मात्र उंदीर जरुर आढळतील. तेही सामान्य आकाराचे नाहीत, तर अक्षरशः मांजरींच्या आकाराचे. या उंदीरांमुळेच भारतीय रेल्वे स्वतः अस्वस्थ झाली आहे. या उंदरांशी सामना करण्यासाठी रेल्वे नवनवीन मार्ग अवलंबत आहे. फक्र उंदीर मारण्यासाठी पश्चिम रेल्वेने (Western Railway) कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. एका आरटीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वेने उंदीर निर्मूलनासाठी मागील तीन वर्षात तब्बल 1.52 कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च केले आहेत.

रेल्वेने इतका पैसा खर्च केल्याचा परिणाम असा झाला की, एकूण 5457 उंदीर मारले गेले. वाचून आनंद वाटेल की रेल्वेने 5 हजार उंदीर मारले. मात्र हे पाच हजार उंदीर मारण्यासाठी रेल्वेने तीन वर्षांत 1.52 कोटी रुपये खर्च केले आहेत. म्हणजेच दिवसाला 5 उंदीर मारण्यासाठी रेल्वेला रोज तब्बल 14 हजार रुपये खर्च आला आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला चेन्नई रेल्वे विभागाने 3 वर्षात उंदीरांवर 5.89 कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच गेल्या दोन वर्षात नागपूर रेल्वे स्थानकात उंदीरांचा सामना करण्यासाठी 10.56 कोटी रुपये खर्च झाले आहेत. (हेही वाचा: रेल्वे तिकीट आरक्षणासाठी नियमात बदल, जाणून घ्या कोणत्या गोष्टीसाठी किती रुपये स्विकारणार)

कीटक आणि कुरतडणारे प्राणी यांना मारण्यासाठी कोच आणि यार्डांमध्ये विशेष सुविधा पुरवण्यासाठी, रेल्वे तज्ञ एजन्सीच्या सेवा वापरतात. या एजन्सीज रेल्वे रोलिंग स्टॉक, स्टेशन परिसर आणि लगतच्या यार्डात पेस्ट फवारणी करून, कीटक व उंदीर यांच्या समस्येवर नियंत्रण ठेवतात. कीटक आणि उंदरांच्या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळण्यासाठी रसायने आणि सापळे यांसारखी इतर विविध तंत्रे वापरली जातात. ठीक ठिकाणी पेस्ट कंट्रोल फवारणीमुळे उंदीर व कीटक रेल्वे आवारात शिरले नाहीत, म्हणूनच मारल्या गेलेल्या उंदरांची अचूक संख्या रेल्वेजवळ उपलब्ध नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.