केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्याचा मोठा परिणाम भारतीय शेअर बाजारावर (Indian Stock Market Updates) पाहायला मिळाला. आज (24 जुलै) सकाळपासूनच स्टॉक मार्केटमध्ये चढ उतार पाहायला मिळाले. बाजार बंद झाला तेव्हा बीएसई आणि एनएसई बेंचमार्क अनुक्रमे सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) 50 लाल रंगात रंगले. तुलनेत स्मॉलकॅप (Smallcap) आणि मिडकॅप (Midcap) कंपन्यांचे समभाग हिरव्या रंगात पाहायला मिळाले. बाजार बंद झाला तेव्हा, सेन्सेक्स 280 अंकांनी किंवा 0.35 टक्क्यांनी घसरून 80,148.88 वर बंद झाला, तर निफ्टी 50 66 अंकांनी किंवा 0.27 टक्क्यांनी घसरून 24,413.50 वर बंद झाला.
नफा कमावण्याल्याने घसरण?
शेअर बाजारातील आजचे चढ-उतार प्रामुख्याने बँकिंग आणि FMCG समभागामध्ये पाहायला मिळाले. समभागातील नफा कमाविण्याच्या हेतूनही ही पडझड झाली असू शकते असे तज्ज्ञ सांगतात. आज घसरलेल्या समभागांमध्ये एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँकेचे समभाग निफ्टी निर्देशांकात अव्वल स्थानावर घसरले. मेहता इक्विटीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) प्रशांत तपासे यांनी लाईव्ह मिंटला प्रतिक्रिया देताना सांगितले की, “गुंतवणूकदारांनी बँकिंग आणि ऑटोमोबाईल समभागांमध्ये त्यांची स्थिती कमी केल्यामुळे नफा घेणे सुरूच राहिले. ज्यामुळे प्रमुख बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली. तथापि, निवडक खरेदी समर्थनावर बाजारांनी त्यांची नीचांकी संपुष्टात आणली असली तरी उच्च मूल्यांकनाची चिंता कायम आहे.” (हेही वाचा, Indian Stock Market Updates: भारतीय शेअर बाजाराची ऐतिहासिक कामगिरी; बँकिंग आणि एफएमसीजी स्टॉक्सच्या आधारे सेन्सेक्सने प्रथमच 80,000 चा टप्पा ओलांडला)
मिडकॅप आणि स्मॉलकॅप वधारले
दरम्यान, मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांनी बेंचमार्कपेक्षा जास्त कामगिरी केली. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.68 टक्क्यांनी वाढला, तर स्मॉलकॅप निर्देशांक 1.91 टक्क्यांनी वाढला. मिड आणि स्मॉल-कॅप शेअर्समधील वाढीमुळे, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्रातील सुमारे ₹446.4 लाख कोटींवरून सुमारे ₹449.6 लाख कोटींवर पोहोचले, ज्यामुळे गुंतवणूकदार सुमारे ₹3.2 कोटी लाखांनी श्रीमंत झाले.
अर्थसंकल्पानंतर, बाजाराने पहिल्या तिमाहीतील कमाई, मॅक्रो वातावरण, जागतिक संकेत आणि स्टॉक फंडामेंटल्सवर लक्ष केंद्रित केले आहे. दीर्घकालीन आणि अल्प-मुदतीच्या भांडवली नफ्यातील वाढीव सुधारणा अल्प मुदतीसाठी बाजाराच्या भावनेवर परिणाम करेल, असे तज्ज्ञांनी सांगितले. बाजारातील आजचा ट्रेंण्ड प्रामुख्याने केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून आला आहे. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात भांडवली नफ्यावर कर वाढवला, विशेषत: इक्विटीवरील दीर्घकालीन भांडवली नफा (LTCG) कर जो पूर्वीच्या 10% वरून 12.5% आणि अल्प-मुदतीचा भांडवली नफा (STCG) कर 15% वरून 20% पर्यंत वाढवला गेला. LTCG कर सवलत मर्यादा देखील ₹1 लाख वरून ₹1.25 लाख करण्यात आली. किरकोळ गुंतवणूकदारांच्या जोखमीच्या साधनामध्ये सहभागास परावृत्त करण्याच्या उद्देशाने फ्युचर्स अँड ऑप्शन्स (F&O) व्यापारावरील सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) च्या दरात वाढ करण्याचाही अर्थमंत्र्यांनी प्रस्ताव दिला आहे, असे त्या म्हणाल्या.