PM Kisan Samruddhi Kendras: पंतप्रधानांच्या हस्ते 600 प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचे उद्घाटन
PM Narendra Modi at Red Fort

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत प्रधानमंत्री किसान सन्मान संमेलन 2022 चे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी रसायने आणि खते मंत्रालयांतर्गत 600 प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचेही (पीएमकेएसके) उद्घाटन केले. याशिवाय, पंतप्रधानांनी, प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक  योजना - एक राष्ट्र एक खत याचा शुभारंभ केला. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी  थेट लाभ हस्तांतरणाद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) अंतर्गत 16,000 कोटी रुपयांचा 12 वा हप्ता देखील जारी केला. पंतप्रधानांनी कृषी स्टार्टअप परिषद आणि प्रदर्शनाचे उद्घाटनही केले. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी ‘इंडियन एज’ हे खतावरील ई-मासिकही प्रकाशित केले. मोदींनी स्टार्टअप प्रदर्शनाच्या संकल्पना पॅव्हेलियनचा आढावा घेतला आणि प्रदर्शनातील उत्पादनांची पाहणी केली.

जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान (संशोधन) हे मंत्र एकाच प्रांगणात उपस्थित असल्याचे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. या मंत्राचे जिवंत रूप आपण येथे पाहू शकतो. किसान संमेलन हे शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य करणे, त्यांची क्षमता वाढवणे आणि प्रगत कृषी तंत्राला चालना देणारे साधन आहे. 'आज 600 हून अधिक प्रधानमंत्री समृद्धी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे,' असे मोदी म्हणाले. ही केंद्रे केवळ खत विक्री केंद्रे नसून देशातील शेतकऱ्यांशी घट्ट नाते निर्माण करणारी यंत्रणा आहे असे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या (पीएम-किसान) नव्या हप्त्याबाबत, पंतप्रधान म्हणाले की, पैसे कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतात.

'कोट्यवधी शेतकरी कुटुंबांना 16,000 कोटी रुपयांचा आणखी एक हप्ताही पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या रुपात जारी करण्यात आला आहे,' असे सांगत दिवाळीच्या आधी हा हप्ता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला. प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक योजना - एक राष्ट्र एक खत आज  सुरू केली आहे. भारत ब्रँडचे स्वस्त दर्जाचे खत शेतकऱ्यांना मिळण्याची सुनिश्चिती करणारी ही योजना आहे असे पंतप्रधान म्हणाले.

केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया मेळाव्याला मार्गदर्शन करताना म्हणाले की, या कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थितीच त्यांची शेतकरी बांधवांविषयी असलेली बांधिलकी दर्शविते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली नवनवीन उपक्रम राबविले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. मांडविया पुढे म्हणाले, पंतप्रधानांनी कृषी क्षेत्रासाठी नेहमीच समग्र दृष्टीकोन ठेवून अनेक कामे केली आहेत आणि सरकारने शेतक-यांना अधिक सक्षम करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब असो, ‘स्मार्ट तंत्रज्ञाना’ला प्रोत्साहन देण्याचे काम असो किंवा शेतक-यांच्या उत्पादनाना  चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम असो, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली अशा ब-याच गोष्टी साध्य झाल्या आहेत.

डॉ. मनसुख मांडविया पुढे म्हणाले की, कृषी क्षेत्रातल्या संशोधन कार्याला प्रोत्साहन देण्यात आल्यामुळे, नॅनो युरियाचे व्यावसायिक उत्पादन सुरू करणारा भारत जगातला पहिला देश बनला आहे. ते म्हणाले की, 600 किसान समृद्धी केंद्र शेतकरी बांधवांना अनेक प्रकारे, अनेक मार्गांनी  बळकट करतील. प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र (पीएमकेएसके) देशातल्या शेतकरी बांधवांच्या गरजा पूर्ण करतील आणि माती, बियाणे आणि खतांच्या परीक्षणाच्या सुविधेसह शेतीसाठी लागणारी मदत (खते, बियाणे,कृषी अवजारे) पुरवतील. या समृद्धी केंद्रांमुळे शेतकरी बांधवांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठीही मदत होईल. अशी माहिती  मांडवीया यांनी दिली.