Oxford COVID-19 Vaccine सर्वसामान्यांसाठी एप्रिल 2021 पर्यंत 'या' किंमतीत उपलब्ध होईल; SII CEO अदर पुनावाला यांची माहिती
Coronavirus Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

कोरोना व्हायरस (Coronavirus) वरील लसी संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती हाती येत आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची (Oxford University) कोविड-19 लस (Covid-19 Vaccine) आरोग्यसेवक आणि वृद्धांसाठी फेब्रुवारी 2021 पर्यंत तर सामान्यांसाठी एप्रिल 2021 पर्यंत उपलब्ध होईल. या लसीचे दोन डोस घ्यावे लागणार असून त्याची किंमत 1000 रुपये इतकी असेल. तसंच 2024 पर्यंत सर्व भारतीयांना ही लस मिळेल, असे सीरम इंस्टीट्युड ऑफ इंडियाचे (Seram Institute of India) सीईओ अदर पुनावाला (CEO Adar Poonawalla) यांनी हिंदुस्तान टाईम्स लीडरशीप समिट 2020 (Hindustan Times Leadership Summit 2020) मध्ये बोलताना सांगितले.

सर्व भारतीयांना लस मिळण्यासाठी 2 ते 3 वर्ष लागतील. यासाठी पुरवठा मर्यादा, बजेट, इतर पायाभूत सुविधा या घटकांसह लस घेण्याची नागरिकांची इच्छा या गोष्टी कारणीभूत असतील. या सर्व बाबी लक्षात घेता लोकसंख्येच्या 80 ते 90 टक्के लोकांना यशस्वीरीत्या लस देण्यात येईल. जर लसीचे दोन डोस घ्यावे लागले तर प्रत्येकाला ते दोन डोस देईपर्यंत 2024 चा कालावधी येऊ शकतो, असे पुनावाला यांनी सांगितले. (COVID-19 Vaccine भारतामध्ये पुढील 4 महिन्यांत तयार असेल: केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केला विश्वास)

या लसीच्या किंमतीविषयी बोलताना पुनावाला म्हणाले की, प्रत्येक डोस हा 5-6 डॉलर म्हणजेच भारतीय किंमतीत अंदाजे 1000 रुपये किंमतीचा असेल. भारत सरकार मोठ्या प्रमाणावर लस विकत घेणार असल्यामुळे त्यांना प्रत्येक डोसमागे 3-4 डॉलर मोजावे लागतील. बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या इतर लसींपेक्षा या लसीची किंमत खूपच कमी आहे, असे पुनावाला म्हणाले.

Oxford-Astrazeneca ची लस प्रौढ व्यक्तींवर खूप चांगल्या प्रकारे कार्य करते. या लसीमध्ये टी-सेल रिस्पॉन्स चांगला असल्यामुळे व्यक्तीला अधिक काळासाठी इम्युनिटी मिळते. परंतु, ही लस दिल्यानंतर काही कालावधीनंतर ही लस दीर्घ काळासाठी परिणामकारक आहे की नाही, हे ठरते. या लसीच्या प्रयोग केलेल्या व्यक्तींमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रतिकूल परिणाम दिसलेले नाहीत. भारतामध्ये घेण्यात आलेल्या ट्रायल्सचे निकाल दीड महिन्यानंतर येतील. त्यावरुन सुद्धा या लसीची कार्यक्षमता ठरवण्यात येईल, असेही पुनावाला यांनी सांगितले. (मुंबई मधील 163 स्वयंसेवकांवर AstraZeneca-Oxford COVID-19 Vaccine चे प्रतिकूल परिणाम नाहीत- BMC)

पुढे त्यांनी सांगितले की, सुरुवातीला ही लस फक्त आरोग्यसेवक आणि प्रौढ व्यक्तींनाच देता येईल. या लसीच्या सुरक्षिततेबाबतची हमी झाल्यानंतरच लहान मुलांना ही लस देण्यात येईल. ऑक्सफर्ड लस ही खूप स्वस्त, सुरक्षित आणि 2 ते 8 डिग्री सेल्सियस तापमानामध्ये ठेवण्यासारखी आहे. भारतामधील कोल्ड स्टोरेजसाठी हे अगदी योग्य तापमान आहे.फेब्रुवारी महिन्यापासून दर महिन्याला 10 कोटी डोसेस बनवण्याचा SII ची योजना आहे.

भारतामध्ये जुलैपर्यंत 40 कोटी डोसेसची गरज आहे. यासाठी सीरम इंस्टीट्युडला सातत्याने काम करावे लागेल आणि जुलै ते ऑगस्ट दरम्यान कोव्हॅक्स ला 10 कोटी डोसेस द्यावे लागतील. परंतु, याबद्दल कोणताही करार झालेला नाही. SII सध्या दुसऱ्या कोणत्याही देशासोबत करार करत नसून भारताला लस पुरवणे हे कंपनीचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोविड-19 लस पुरवण्याच्या बाबतीत भारत प्राधान्यक्रमावर असून त्याचसोबतच आफ्रीकेमध्ये सुद्धा पुरवठा करावा लागेल. त्यानंतरच आम्ही इतर देशांना मदत करु शकू. 2021 च्या पहिल्या तिमाहीत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीचे 30-40 कोटी डोसेस उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.