
Onion Buffer Stock: टोमॅटो हा शब्द जरी उच्चारला तरी सध्या सामान्य माणसाच्या डोळ्यासमोर तारे चमकावे अशी स्थिती आहे. भारतात टोमॅटो दर (Tomato Price) गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पावभाजी, बिर्याणी आणि तत्सम पादार्थातून टोमॅटो गायब झाला आहे. त्याच मार्गाने आता कांदा जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. कारण, देशातील विविध ठिकाणी कांद्याचा दरही चढू लागला आहे. दरम्यान, संभाव्य स्थिती विचारात घेता कांदा टोमॅटोच्या मार्गाने जाऊ नये, यासाठी केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्राने आपल्या बफर स्टॉकमधून मुख्य भाजीपाला आणि कांद्याचा साठा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
कांदा टोमॅटोच्या वाटेवर?
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी काल (गुरुवार, 9 ऑगस्ट) एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीस कृषी पणन संस्थांच्या व्यवस्थापकीय संचालक (NAFED) आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NCCF) उपस्थित होते. या बैठकीत कांद्याचा संभाव्य तुटवडा भरून काढण्यासाठी व तशी स्थिती निर्माणच झाली तर पूर्वतयारी म्हणून काय उपाययोजना करता येतील यावर विचार विनिमय झाला. या उपाययोजनांचाच एक भाग म्हणून सरकारच्या बफर स्टॉकमधून कांदा बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने यापूर्वी 2023-24 हंगामात 3 लाख टन कांद्याचा बफर स्टॉक म्हणून ठेवण्याचा निर्णय घेतला होता. कमी पुरवठ्याच्या हंगामात दर लक्षणीय वाढल्यास, कोणत्याही अत्यावश्यक परिस्थितीची पूर्तता करण्यासाठी आणि किंमत स्थिरीकरणासाठी बफर स्टॉक राखला जातो. देशात टोमॅटोच्या वाढत्या किमती पाहता कांदासुद्धा टोमॅटोच्या वाटेवर आहेका असाही सवाल उपस्थित केला जातो आहे.

बफर स्टॉक म्हणजे काय?
अस्थिर बाजारपेठेत किमती स्थिर ठेवण्यासाठी वापरली जाणारी सरकारी योजना म्हणून बफर स्टॉक प्रणालीकडे पाहता येते. शेतमालाचे दर कमी असताना भविष्यातील संभाव्य तुटवडा, आणिबाणी, आपत्कालीन स्थिती अथवा बाजारातील भाव पडले असताना शेतकऱ्याला आधार म्हणून सरकार शेतमालाची खरेदी करते. त्याचा एक मोठ्या प्रमाणावर साठा तयार केला जातो. भविष्यात जेव्हा एखाद्या शेतमालाचे (उदा. कांदा, अन्नधान्य) उत्पादन कमी होते. परिणामी बाजारात पुरवठा कमी होतो, कधी कधी इतर कारणांमुळे त्या शेतमालाच्या किमती अचानक वाढतात. अशा वेळी बाजारपेठ अस्थिर होते. सर्वसामान्य नागरिकाचे गणित कोलमडते. अशा वेळी केंद्र सरकार बफर स्टॉक बाहेर काढते. नागरिकांना अत्यंत कमी किमतीमध्ये अन्नधान्य मिळते तसेच भावही नियंत्रणात राहतात.