गुरुवारी कर्नाटकात ओमिक्रॉन (Omicron) संसर्गाची प्रकरणे समोर आल्यानंतर आता भारतही कोविडच्या नवीन प्रकाराची लागण झालेल्या देशांच्या यादीत सामील झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोविडच्या या प्रकाराला चिंतेचा सर्वात संसर्गजन्य प्रकार म्हटले आहे. आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी जाहीर केली आहे. सरकारने लोकांना ओमिक्रॉनबद्दल घाबरू नका असे आवाहन केले आहे. भारतात, ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला एक रुग्ण 66 वर्षांचा आहे तर दुसरा 46 वर्षांचा आहे.
यापैकी एक दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे तर दुसरा स्थानिक डॉक्टर आहे. ओमिक्रॉन संसर्गाबाबत, कोविड टास्क फोर्सच्या सदस्याने सांगितले की, यावेळी लसीकरण, जीनोम सिक्वेन्सिंग आणि प्रवासाच्या नियमांमध्ये दक्षता याद्वारे याला सामोरे जाऊ शकतो. देशात अशी जवळपास 12 विमानतळे आहेत जिथे जास्त जोखीम असलेल्या देशांमधून विमाने येत आहेत. येथून येणाऱ्या प्रवाशांची अनिवार्य चाचणी केली जात आहे. यासोबतच 'जोखीम'च्या यादीत समाविष्ट असलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांच्या स्क्रीनिंगसाठी दिल्ली आणि मुंबई विमानतळांवर कडक व्यवस्था करण्यात आली आहे.
कोविडचे हे नवीन रूप डेल्टासारखे धोकादायक आहे की नाही, या प्रश्नाचे उत्तर सध्यातरी देणे अवघड आहे. सध्या जगभरातील शास्त्रज्ञ या विषाणूच्या संभाव्यतेचा अभ्यास करत आहेत. सूत्रांच्या मते, व्हायरसबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी अजून एक ते दोन आठवडे लागतील. जागतिक आरोग्य संघटनेकडेही या प्रकाराबद्दल फारशी माहिती नाही. याला चिंतेचा प्रकार म्हणून संबोधले जात असले तरी, डब्ल्यूएचओने म्हटले होते की हा आधीच्या प्रकारापेक्षा जास्त संसर्गजन्य आहे.
Omicron हा SARS-CoV-2 चा एक नवीन प्रकार आहे जो अलीकडेच 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून नोंदवण्यात आला होता. जागतिक आरोग्य संघटनेने 26 नोव्हेंबर रोजी याबाबत इशारा दिला होता. या नवीन व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेची शंका व्यक्त केली जात आहे. परंतु सरकारने अजूनतरी अशी शक्यता वर्तवली नाही.
सरकारने म्हटले आहे, ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण दक्षिण आफ्रिकेबाहेरही वाढत असल्याचे, दिसून येत आहे.आणि त्याची वैशिष्ट्ये बघता, तो भारतासह आणखी काही देशात पसरण्याची शक्यता आहे. मात्र, रुग्णसंख्येत होणाऱ्या वाढीची संख्या आणि गांभीर्य तसेच या स्वरूपाच्या विषाणूचा संसर्ग कितपत गंभीर असू शकेल, हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. (हेही वाचा: कर्नाटक मध्ये आढळले ओमिक्रॉन चे 2 रूग्ण; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती)
त्यापुढे, भारतात, ज्या झपाट्याने लसीकरण होत आहे ते बघता, तसेच डेल्टा व्हेरियंटच्या बाबतीत, भारतात करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणात अनेकांमध्ये सामूहिक रोगप्रतिकारशक्ति विकसित झाल्याचे निदर्शनास आले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर, येणाऱ्या आजाराची तीव्रता कमी राहील असा अंदाज आहे. मात्र, असे असले तरीही, याबाबतीत शास्त्रीय पुरावे अद्याप विकसित होत आहेत.
योग्य प्रकारे मास्कचा वापर करणे, लसींचे दोन्ही डोस घेणे (अद्याप लसीकरण केले नसल्यास), सामाजिक अंतर राखणे आणि जास्तीत जास्त चांगले व्हेंटीलेशन ठेवणे महत्वाचे असल्याचे, मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि योग्य मार्गदर्शक तत्त्वे जारी करत आहे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.