No-Married Women: जगातील सर्वात प्रमुख टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या ॲपलने (Apple) अलीकडेच भारतात आयफोनचे उत्पादन वाढवले आहे. कंपनी भारतात इतर उपकरणांचे उत्पादन सुरू करण्याच्या योजनेवर काम करत आहे. भारतात, हे काम त्यांचे मुख्य पुरवठादार फॉक्सकॉन (Foxconn) करत आहे. दक्षिण भारतामध्ये फॉक्सकॉनचा मोठा प्लांट आहे. आता अहवालानुसार, फॉक्सकॉन आपल्या कारखान्यामध्ये विवाहित महिलांना नोकऱ्या देत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
रॉयटर्सने आपल्या तपास अहवालात म्हटले आहे की, मार्च 2023 मध्ये पार्वती आणि जानकी नावाच्या दोन महिला नोकरीसाठी फॉक्सकॉन कारखान्यात गेल्या. या दोघींचे वय सुमारे 20 वर्षे होते. कारखान्याच्या गेटवर उपस्थित असलेला गार्डने त्यांना त्या विवाहित आहेत का? असे विचारले. त्यांनी ‘हो’ असे उत्तर दिल्यावर त्यांना परत जाण्यास सांगितले.
पार्वतीला बसस्थानकापासून कारखान्याच्या गेटपर्यंत घेऊन जाणाऱ्या ऑटोरिक्षा चालकानेही कंपनी विवाहित महिलांना नोकरी देत नसल्याचे सांगितले होते. जेव्हा रॉयटर्सने याबाबत अधिक तपास केला तेव्हा, फॉक्सकॉनशी संबंधित सुमारे 17 कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर कंपनीच्या या वृत्तीची पुष्टी केली. रॉयटर्सने फॉक्सकॉन इंडियाचे माजी मानव संसाधन कार्यकारी एस. पॉलचा हवाला देऊन म्हटले की, विवाहित महिलांवर अविवाहित महिलांपेक्षा कौटुंबिक जबाबदाऱ्या अधिक असतात, त्यामुळे कंपनी एका प्रणाली अंतर्गत विवाहित महिलांना भारतातील मुख्य आयफोन असेंबली कारखान्यात नोकरी मिळण्यापासून वगळते.
एस. पॉल म्हणतात, कर्मचारी भरतीशी संबंधित हे नियम कंपनीच्या अधिकाऱ्यांना तोंडी सांगितले जातात. हे नियम कंपनीसाठी काम करणाऱ्या भरती एजन्सींना देखील सांगितले जातात. मुलाखतीदरम्यानच विवाहित महिलांना नोकरी मिळवण्याच्या शर्यतीतून बाहेर काढले जाते. विवाहित महिलांना कामावर न घेण्याचे कारण त्यांच्यावरील 'सांस्कृतिक' आणि 'सामाजिक दबाव' असल्याचे सांगितले. कंपनीच्या दृष्टीने लग्नानंतर विशेषत: मुले झाल्यानंतर महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
यामागचे दुसरे कारण म्हणजे विवाहित महिलांणा काही ठराविक दागिने परिधान करावे लागतात, ज्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. मात्र कंपनीच्या तीन माजी एचआर अधिका-यांचा हवाला देत बातमीत असेही म्हटले आहे की, जेव्हा उत्पादनाची मागणी जास्त असते किंवा जेव्हा मजुरांची कमतरता असते तेव्हा हा नियम शिथिल केला जातो. अशावेळी हायरिंग एजन्सी देखील महिलांना नोकरी मिळविण्यासाठी त्यांची वैवाहिक स्थिती लपवण्यास सांगतात. (हेही वाचा: Financial Frauds: गेल्या 3 वर्षांत जवळपास 47 टक्के भारतीयांची झाली आर्थिक फसवणूक; UPI आणि Credit Card संबंधित प्रकरणे सर्वाधिक)
दरम्यान, ॲपल आणि फॉक्सकॉन या दोन्ही कंपन्यांना या आरोपांची जाणीव आहे. त्यांनी कबूल केले होते की 2022 साठी त्याच्या नियुक्ती प्रक्रियेत चुका झाल्या होत्या आणि त्यांनी सुधारणा करण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु रॉयटर्सच्या तपासणीत असे आढळून आले की, हा भेदभाव प्रत्यक्षात 2023 आणि 2024 मध्येही चालू होता.