Indian Railway (Photo Credits: File Photo)

भारतामध्ये कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी आता लॉक डाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. दरम्यान या काळात भारतीय रेल्वेची प्रवासी वाहतूक देखील ठप्प राहील असे सांगण्यात आले आहे. मात्र रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या काळात आगामी रेल्वे बुकिंगदेखील बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आयआरसीटीसी च्या नियमांनुसार प्रवाशांना चार महिने आधी रेल्वे बुकिंग करण्याची मुभा दिली जाते. मात्र या कोरोना व्हायरस लॉकडाऊन काळात आगामी महिन्यांची रेल्वे बुकिंग ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे बंद राहणार असल्याची स्पष्टोक्ती देण्यात आली आहे. Coronavirus Lockdown: भारतामध्ये 3 मे पर्यंत देशांर्तगत तसेच आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित

लॉकडाऊन वाढवल्याची आज सकाळी घोषणा करताच रेल्वे मंत्रालयाकडून एका परिपत्रकाच्या माध्यमातून 3 मेच्या रात्री 12 वाजेपर्यंत कोकण रेल्वे, पॅसेंजर रेल्वे, मेल एक्सप्रेस, प्रिमियम ट्रेन्स, कोलकता मेट्रो यासारख्या सार्‍या रेल्वे सेवा बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. सोबत आता अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा पर्यायही बंद करण्यात आला आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात आगामी दिवसांमधील तिकीट बुकिंग बंद करण्यात आले नव्हते. दरम्यान यावरून सोशल मीडियामध्ये अनेक अफवा, फेक न्यूजदेखील पसरल्या होत्या. मात्र नंतर रेल्वे प्रशासनाला त्यावर खुलासा द्यावा लागला होता. Coronavirus: देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्यात आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

दरम्यान IRCTC च्या e-ticket काढलेल्या प्रवाशांना तिकीटं रद्द न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रवाशांच्या खात्यामध्ये येत्या काही दिवसात सारी रक्कम रिफंड केली जाणार आहे. अशी माहितीदेखील रेल्वेने दिली आहे. तर काऊंटरवर तिकीट काढलेल्या प्रवाशांना देखील रिफंड मिळवण्यासाठी तिकीटबारीवर गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. रेल्वेकडून ऑफलाईन तिकीट रिफंड करण्याच्या मुदतीमध्ये वाढ केली जाणार आहे.

प्रवासी वाहतूक बंद असली तरीही 58 मार्गांवर सुमारे 109 मालगाड्या धावत आहेत. यांच्यामाध्यमातून जीवनावश्यक माल, महत्त्वाच्या वस्तूंची ने-आण केली जात आहे. फ्लिपकार्ट, इंडीया पोस्टदेखील या पार्सल मेलचा वापर करून वस्तूंची ने आण करत आहेत.

सध्या भारतातील वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता रेल्वेनेदेखील सुमारे 40,000 कोचचं रूपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये केले आहे. तसेच रेल्वेकडूनही फेस मास्क, हॅन्ड सॅनिटायझर आणि पीपीई कीटच्या निर्मितीचं काम सुरू करण्यात आलं आहे.