
जगातील 20 सर्वात प्रदूषित शहरांपैकी (Most Polluted City) 13 शहरे भारतात आहेत. मेघालयातील बर्निहाट हे या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याच वेळी, सर्वाधिक प्रदूषित राजधानीच्या श्रेणीत दिल्ली अव्वल स्थानावर आहे. स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी आयक्यू एअरच्या 2024 च्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. अहवालात, जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे. 2023 मध्ये, देश तिसऱ्या स्थानावर होता, म्हणजे भारत आधीपेक्षा दोन स्थानांनी घसरला आहे. याचा अर्थ असा की भारतातील प्रदूषणात आधीच काही सुधारणा झाली आहे. अहवालात म्हटले आहे की 2024 पर्यंत भारतात पीएम 2.5 च्या पातळीत 7% घट पाहिली गेली.
2024 मध्ये पीएम 2.5 ची पातळी सरासरी 50.6 मायक्रोग्राम प्रति घनमीटर होती, तर 2023 मध्ये ती 54.4 मायक्रोग्राम प्रति घनमीटर होती. तरीही, जगातील 10 सर्वात प्रदूषित शहरांपैकी 6 शहरे भारतात आहेत. दिल्लीत प्रदूषणाची पातळी सतत वाढत होती. येथे पीएम 2.5 ची वार्षिक सरासरी 91.6 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर होती.
जगातील टॉप 20 प्रदूषित शहरांपैकी 13 शहरे भारतातील आहेत, ज्यात बर्निहाट, दिल्ली, मुल्लानपूर (पंजाब), फरीदाबाद, लोणी, नवी दिल्ली, गुडगाव, गंगानगर, ग्रेटर नोएडा, भिवाडी, मुझफ्फरनगर, हनुमानगड आणि नोएडा यांचा समावेश आहे. एकूणच, 35 टक्के भारतीय शहरांमध्ये वार्षिक पीएम 2.5 पातळी जागतिक आरोग्य संघटनेच्या 5 मायक्रोग्राम प्रति घनमीटर मर्यादेपेक्षा 10 पट जास्त आहे. भारतात वायू प्रदूषण हा एक गंभीर आरोग्य धोका आहे, ज्यामुळे आयुर्मान अंदाजे 5.2 वर्षांनी कमी होते. गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ अभ्यासानुसार, 2009 ते 2019 पर्यंत, भारतात दरवर्षी प्रदूषणामुळे सुमारे 15 लाख मृत्यू झाले. (हेही वाचा: Mumbai Air Pollution: मुंबई मध्ये पेट्रोल, डिझेल कार वर बंदी येणार? वाढत्या वायुप्रदुषणावर तोडगा काढण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन)
जगातील टॉप 20 प्रदूषित शहरांमध्ये शेजारील देश पाकिस्तानमधील चार शहरे आणि चीनमधील एक शहर समाविष्ट आहे. अहवालानुसार, 2024 मध्ये ओशनिया हा जगातील सर्वात स्वच्छ प्रदेश होता. त्यातील 57% शहरे जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतात. ओशनियामध्ये 14 देश आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी, पापुआ न्यू गिनी, नौरू, किरिबाटी, मायक्रोनेशिया आणि मार्शल बेटे यांचा समावेश आहे. पीएम 2.5 म्हणजे हवेत असलेले 2.5 मायक्रॉनपेक्षा लहान सूक्ष्म प्रदूषण कण. हे कण फुफ्फुसांमध्ये आणि रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात, ज्यामुळे श्वसनाच्या समस्या, हृदयरोग आणि अगदी कर्करोग देखील होऊ शकतात. त्याचे स्रोत म्हणजे वाहनांमधून निघणारा धूर, औद्योगिक उत्सर्जन आणि लाकूड किंवा पिकांचे अवशेष जाळणे.