![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/05/Monkeypox-380x214.jpg)
मंकीपॉक्स (Monkeypox) विषाणूमुळे देशात आणि जगात भीतीचे वातावरण आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) बऱ्याच काळापासून जगभरातील लोकांना या आजाराच्या लक्षणांबद्दल सतर्क करत आहे. अशा परिस्थितीत भारतातही या विषाणूबाबतच्या प्रत्येक लहान-मोठ्या घटनेवर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरातील एका विद्यार्थ्यामध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळून आल्याचे वृत्त आहे. लक्षणे दिसून आल्यानंतर या विद्यार्थ्याला वेगळे करण्यात आले असून त्याची सर्व प्रकारे तपासणी केली जात आहे. या व्यक्तीमध्ये दिसून आलेली सर्व लक्षणे मांकीपॉक्सची असल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
हा विद्यार्थी काही दिवसांपूर्वी युरोपियन देशातून परतला होता. हा तरुण पश्चिम मिदनापूरचा रहिवासी असून आता त्याच्या शरीरावर पुरळ आणि इतर मंकीपॉक्सची लक्षणे जाणवत आहेत. यानंतर त्याला कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्याला आयसोलेट केले आहे. अद्यापही ही लक्षणे संशयास्पद असल्याने त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) येथे पाठवण्यात आले आहेत. तपास अहवाल अद्याप आलेला नाही.
या विद्यार्थ्याच्या घरातील लोकांनाही पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागाने सतर्क केले आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, देशातील ही पहिलीच घटना आहे जेव्हा संशयित व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सचा नमुना तपासणीसाठी पाठवला गेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने पुष्टी केली आहे की, जगभरातील मांकीपॉक्स प्रकरणांची संख्या साप्ताहिक 75 टक्क्यांहून अधिक वाढली आहे, सध्याची संख्या 6,000 आहे. दक्षिण आफ्रिकेतील भागात उगम पावलेला मंकीपॉक्स आता जगाच्या विविध भागांत नोंदवला गेला आहे. (हेही वाचा: Monkeypox Virus: जगभरात मंकीपॉक्स संसर्गात वाढ, 58 देशांमध्ये प्रसार, WHN कडून महामारी घोषित)
दरम्यान, डब्ल्यूएचओच्या मते, मंकीपॉक्सचा संसर्गापासून लक्षणे सुरू होण्यापर्यंतचा कालावधी साधारणपणे 6 ते 13 दिवसांचा असतो. काही लोकांमध्ये तो 5 ते 21 दिवसांपर्यंत असू शकतो. संक्रमित व्यक्तीला ताप, तीव्र डोकेदुखी, लिम्फॅडेनोपॅथी (लिम्फ नोड्सची सूज), पाठ आणि स्नायू दुखणे यासह तीव्र अशक्तपणा येऊ शकतो. सूजलेल्या लिम्फ नोड्सची समस्या हे सर्वात सामान्य लक्षण मानले जाते. याशिवाय रुग्णाच्या चेहऱ्यावर आणि हात-पायांवर मोठ्या आकाराचे पुरळ येऊ शकतात.