'Maharashtra Pattern' Likely in Bihar: बिहारमध्ये 'महाराष्ट्र पॅटर्न'? तेजस्वी यादव यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न कायम, आरजेडीने साधला मुकेश सहानी यांच्याशी संपर्क, उपमुख्यमंत्री पदाची ऑफर
Tejashwi Yadav | (Photo Credits: Facebook)

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल ( Bihar Assembly Election Result 2020) अगदी घासून लागले. अत्यंत काट्याची टक्कर झाली. यात एनडीएला बहुमत मिळाले हे खरे असले तरी राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी मात्र बिहारचे मुख्यमंत्री होण्याची आस अद्यापही कायम ठेवली आहे. त्या दृष्टीने त्यांनी तशा हालचालीही सुरु केल्या आहेत. त्यामुळे बिहारमध्येही महाराष्ट्र पॅटर्न ('Maharashtra Pattern' Likely in Bihar) पाहायला मिळणार का? याबाबत उत्सुकता आहे.

प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय जनता दल एनडीएमधील दोन घटक पक्षांच्या संपर्कात आहे. यातील एक आहे मुकेश सहानी यांची विकासशील इनसान पार्टी आणि दुसरी आहे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांची हिंदुस्तानी आवाम मोर्चा पार्टी. मांझी आणि सहानी या दोघांच्याही पक्षाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतू आमच्यासाठी सर्व मार्ग खुले असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय जनता दलाने या मुकेश सहानी यांना तर उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे. (हेही वाचा, Left parties in Bihar: कन्हैय्या कुमार यांची जादू, तेजस्वी यादव यांची खेळी कामी आली, बिहारमध्ये डाव्या पक्षांची मुसंडी)

बिहार विधानसभा निवडणूक निकाल

एनडीए - 125 जागा (भाजप 74, जदयु 43, VIP 4, HAM 4)

महागठबंधन - 110 जागा (आरजेडी 75, काँग्रेस 19, डावे पक्ष 16)

अन्य - 8 जागा (AIMIM 5, BSP 1, LJP 1, अपक्ष 1)

समिकरण काय?

मुकेश सहानी यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. परंतू, त्यांच्या विकासशील इनसान पार्टीला 4 तर जीनत राम माझी याच्या हम पक्षाला 4 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे हे पक्ष जर महागठबंधनसोबत गेले तर एनडीएचे बहुमत अडचणीत येऊ शकते. त्यामुळे तेजस्वी यादव यांचा बाण बरोबर लागला तर राजदचा सत्तेचा कंदील बिहारमध्ये पेटू शकतो.  (हेही वाचा, Chirag Paswan: चिराग पासवान यांनी काय कमावले? स्वत:ची नाव तर बुडवलीच, नीतीश कुमार यांच्याही जहाजाला तडे घालवले, भाजप हनुमानाला गिफ्ट देणार का?)

एकूण 243 इतकी सदस्यसंख्या असलेल्या बिहार विधानसभेत बहुमतासाठी 122 हा जादूई आकडा आहे. एनडीएकडे 125 इतका आकडा आहे. तर महागठबंधनकडे 110. म्हणजे एनडीएकडे बहुमताच्या आकड्यापेक्षा केवळ 3 जागा अधिक आहेत. तर महागठबंधनकडे बहुमताला 012 जागा आवश्यक आहेत.