मध्य प्रदेश (Madhya Pradesh) सरकारने राज्यभरात वाढत्या भटक्या कुत्र्यांचे (Stray Dogs) व्यवस्थापन करण्यासाठी सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची (IAS Officers) नियुक्ती केली आहे. भटके कुत्रे ही समस्या केवळ रस्त्यावर आणि निवासी भागातच नाही तर सरकारी आवारातही एक लक्षणीय चिंतेची बाब बनली आहे. त्यामुळे या समस्येच्या निराकरणार्थ मध्य प्रदेश सामान्य प्रशासन विभागाने अतिरिक्त मुख्य सचिव स्तरापर्यंतच्या आयएएस अधिकाऱ्यांसह 15 सदस्यांची समिती स्थापन करण्याचा आदेश जारी केला आहे.
कुत्रा चावल्याच्या दरवर्षी 21,000 हून अधिक घटना
एका आकडेवारीनुसार मध्य प्रदेश राज्यात दरवर्शी नागरिकांना कुत्रा चावण्याच्या जवळपास 21,000 हून अधिक घटना नोंदवल्या जातात. गेल्या पाच वर्षांत भटक्या कुत्र्यांनी पाच जणांचा बळी घेतला असून त्यात रेबीजने मृत्यूमुखी पडलेल्यांचाही समावेश आहे. एकट्या भोपाळमध्ये, रुग्णालयांमध्ये दररोज भटका कुत्रा चावण्याच्या सरासरी 55 केसेस येतात. अलीकडील घटना या समस्येची तीव्रता अधोरेखित करतात. 1 जुलै रोजी भोपाळमधील लालघाटी येथील कुणालला कुत्र्याने चावा घेतला, त्याला आठ टाके पडले. पाच दिवसांनंतर, 16 वर्षीय रवी साहू आपल्या कुटुंबासह रायसेन येथील एका मंदिराला भेट देत असताना भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. 9 जुलै रोजी सेठानी घाट, होशंगाबाद येथे एका व्यक्तीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला, परिणामी त्याच्या पायाला खोल जखमा झाल्या. (हेही वाचा, Kerala HC On Stray Dogs: भटक्या कुत्र्यांपेक्षा मानवी जीवनाला प्राधान्य द्यावे- हायकोर्ट)
विरोधकांची जोरदार टीका
प्राप्त आकडेवारी आणि घटनांवर विचार करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करणारी समिती नेमण्याचा निर्णय घेतल्याचे राज्य सरकार सांगत आहे. त्यावर विरोधकांनी मात्र आक्षेप घेतला आहे. राज्य सरकारला व्यवस्थापन आणि प्रशासकीय पातळीवर आलेल्या अपयशातून हा निर्णय घेतल्याचे विरोधकांची म्हणने आहे. पशुसंवर्धन मंत्री लखन पटेल यांनी सांगितले की, "आम्ही आमच्या डेटाची कसून तपासणी केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. जीव वाचवणे हे आमचे प्राधान्य आहे, म्हणूनच आम्ही अधिकाऱ्यांची ही समिती स्थापन केली आहे." (हेही वाचा, Save From Dog: कुत्र्यांपासून वाचवा हो! कोल्हापूरच्या जनतेचे CJI DY Chandrachud यांना पत्र)
शेल्टर होममध्ये भटक्या कुत्र्यांची गर्दी
भोपाळमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद पाहायला मिळतो. महानगरपालिकेच्या शेल्टर होममध्ये भटक्या कुत्र्यांची गर्दी असते. दररोज डझनभर लोक रेबीजचे इंजेक्शन घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये रांगा लावतात, अशी परिस्थती आहे. दरम्यान, रुग्णालयाच्या आकडेवारीतून चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. 2022 मध्ये, 8,124 हून अधिक कुत्रे चावण्याच्या घटनांची नोंद झाली आणि 2023 मध्ये, ही संख्या जवळजवळ दुप्पट होऊन 16,387 झाली. 2024 च्या पहिल्या पाच महिन्यांत कुत्रा चावण्याच्या 7,728 प्रकरणांची नोंद झाली आहे.
दरम्यान, प्राणी कल्याणासाठी काम करणाऱ्या संस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. "सरकारचे हे पाऊल कौतुकास्पद आहे. हे वरिष्ठ अधिकारी चांगले निर्णय घेतील आणि समस्या सोडवतील," असे पीपल फॉर ॲनिमल्सच्या अध्यक्षा स्वाती गौरव यांनी सांगितले.