केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या भारतीयांसाठी आनंदाची आणि तितकीच अभिमानाची गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयांमध्ये भारताची बाजू प्रभावीपणे मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे (Senior Advocate Harish Salve) यांच्या कामगिरीने थेट इंग्लंडच्या महाराणीही प्रभावीत झाल्या आहेत. इतक्या की त्यांनी हरीश साळवे (Harish Salve) यांची थेट आपले वकील म्हणून नियुक्ती केली आहे. म्हणजेच मराठमोळे वकील हरीश साळवे आता इंग्लंडच्या महाराणीचे वकील असणार आहेत. इंग्लंडच्या कायदा आणि न्याय मंत्रालयाने महाराणीच्या वकिलांची नवी यादी नुकतीच प्रसिद्ध केली. यात साळवे यांच्या नावाचा समावेश आहे. ज्या इंग्रजांनी भारतावर राज्य केले. भारताला कायदा शिकविण्याचा प्रयत्न केला. त्याच इंग्लंडच्या महाराणी आज भारतीय कायदेपंडीताचा सल्ला घेत आहेत. काळाचा महिमा म्हणतात तो हाच.
हरीश साळवे हे इंग्लंडच्या महाराणीसाठी कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे ‘क्वीन काऊंसिल’ (Queen's Counsel for Courts of England & Wales) म्हणून काम पाहणार आहेत. येत्या 16 मार्च 2020 या दिवशी साळवे यांच्या नावाची महाराणीचे ‘क्वीन काऊंसिल’ म्हणून अधिकृत घोषणा होणार आहे. हरीश साळवे हे कायदा क्षेत्रातील मोठे नाव आहे. खास करुन आंतरराष्ट्रीय कयदेपंडीत म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय खटल्यांमधील योगदान पाहूनच इंग्लंडच्या महाराणीने त्यांची नियुक्ती केल्याचे सांगितले जात आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या 'कुलभूषण जाधव' प्रकरणात हरीश साळवे यांनी भारताची बाजू जोमाने मांडली होती. विशेष म्हणचे केवळ एक रुपया मानधनावर त्यांनी कुलभूषण जाधव यांचा खटला भारताच्या वतीने लढला होता.
हरीश साळवे हे भारतातील सर्वात महागडे समजल्या जाणाऱ्या वकीलांपैकी एक म्हणून ओळखले जातात. असेही सांगितले जातेकी, न्यायालयात केवळ एक वेळा उपस्थित राहण्यासाठी ते तब्बल चार ते पाच लाख रुपये घेतात. इतकच नव्हे तर, संपूर्ण दिवसभरासाठी जर न्यायालायत उपस्थित राहायचे असेल तर, त्यांचे मानधन चक्क 25 ते 30 लाख रुपये इतके असते.
हरीश साळवे यांच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे तर त्यांना वकिलीचे बाळकडून घरातूनच मिळाले. पी. के. साळवे हे त्यांचे आजोबा. ते प्रख्यात क्रीमिनिल लॉयर होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर कायद्याचे संस्कार झाले. हरीश यांचे वडील एन. के. पी. साळवे हे काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांपैकी एक होते. त्यामळे राजकारण आणि कायदा या दोन्ही क्षेत्रांशी त्यांचा लहानपणापासूनच संबंध आला. धुळे जिल्ह्यातील वरुड गावी जन्मलेल्या साळवे हे 1992 मध्ये सर्वोच्च न्यायालयात वकील झाले. 1999 मध्ये त्यांना सॉलिसिटर म्हणून काम पाहण्याची संधी मिळाली. (हेही वाचा, US Census 2020: शिख समुदयाची अमेरिकेमध्ये अल्पसंख्याक म्हणून पहिल्यांदाच होणार जनगणना)
खरे तर, साळवे हे मुळात सीए आहेत. परंतू, प्रसिद्ध कायदेपंडीत नानी पालखीवाला यांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव पडला. या प्रभावातूनच ते वकिलीकडे आकृष्ट झाले. त्यांनी वकीलीचे शिक्षण घेतले. सुरुवातीपासूनच साळवे यांनी अनेक मोठमोठे खटले लढवले. तसेच, प्रसिद्ध लोकांचे खटलेही साळवे यांच्याकडे लढविण्यासाठी आले. यात कुलभूषण जाधव, सलमान खानचं हिट अँड रन प्रकरण, कृष्णा गोदावरी बेसिन गॅस वाद, बिल्किस बानो प्रकरण, व्होडाफोन आणि केंद्र सरकार वाद एक ना अनेक खटल्यांचा यात समावेश आहे. असा हा अनुभवसमृद्ध व्यक्ती ब्रिटनच्या राणीचा वकील होतो हा कोणत्याही भारतीयासाठी कौतुकाचाच क्षण!