Gold | File Image

Indian Gold Reserves: भारतात प्राचीन काळापासून सोने (Gold) हे परंपरा आणि सांस्कृतिक महत्त्वाचे प्रतीक आहे. विशेषतः स्त्रियांमध्ये सोन्याची खास आवड दिसून येते. लग्नासारख्या समारंभात तर सोन्याला विशेष महत्त्व असते. परिधान करण्यासोबतच गुंतवणुकीचा पर्याय म्हणूनही सोन्याकडे पाहिले जाते. यामुळेच भारतीय महिलांकडे सोन्याचा मोठा साठा आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या मते, भारतीय महिलांकडे मिळून सुमारे 24,000 टन सोने आहे. हे दागिन्यांच्या रूपात जगातील एकूण सोन्याच्या साठ्यापैकी 11 टक्के आहे. भारतीय महिलांकडे असलेले एकूण सोने पहिल्या पाच देशांच्या एकत्रित सोन्याच्या साठ्यापेक्षा जास्त आहे.

जर तुलना करायची झाली तर, अमेरिकेकडे 8,000 टन, जर्मनीकडे 3,300 टन, इटलीकडे 2,450 टन, फ्रान्सकडे 2,400 टन आणि रशियाकडे 1,900 टन सोने आहे. याचा अर्थ या देशांतील सोन्याचा साठा एकत्र केला तर तो भारतीय महिलांकडे असलेल्या सोन्यापेक्षा कमी आहे. सोन्याच्या मालकीच्या बाबतीत दक्षिण भारतातील महिला खूप पुढे आहेत. भारताच्या एकूण सोन्यापैकी 40 टक्के सोन्याचा वाटा दक्षिणेकडील प्रदेशात आहे. यात एकट्या तामिळनाडूचा वाटा 28 टक्के आहे.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या 2020-21 च्या अभ्यासात असेही सूचित करण्यात आले आहे की, भारतीय कुटुंबांकडे 21,000 ते 23,000 टन सोने होते. 2023 पर्यंत, हा आकडा अंदाजे 24,000 ते 25,000 टन किंवा 25 दशलक्ष किलोग्राम सोन्यापेक्षा जास्त झाला होता. देशाच्या संपत्तीचा हा मोठा हिस्सा आहे. हे सोन्याचे साठे भारताच्या अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी भूमिका बजावतात, ज्याचा देशाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात 40 टक्के वाटा आहे. (हेही वाचा: Key Changes from January 1: GST, Telecom, Visas यांसह अनेक नियमांमध्ये बदल; 1 जानेवारी 2025 पासून नवे नियम लागू)

गेल्या अनेक महिन्यांपासून आरबीआय सातत्याने सोन्याची खरेदी करत आहे. सध्या आरबीआयच्या एकूण परकीय चलनाच्या साठ्यात सोन्याचा वाटा 10.2 टक्के झाला आहे. सेंट्रल बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील सोन्याचा साठा नोव्हेंबरअखेर 876.18 टन इतका वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण नऊ टक्क्यांनी अधिक आहे. 1 डिसेंबर 2023 रोजी देशातील सोन्याचा साठा 803.58 टन होता.

भारतीय आयकर कायद्यानुसार, विवाहित महिलांना 500 ग्रॅम सोने ठेवण्याची परवानगी आहे, तर अविवाहित महिलांसाठी ही मर्यादा 250 ग्रॅम आहे. तज्ज्ञांच्या मते, वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासारखे विकसनशील देश त्यांच्या सोन्याच्या साठ्यात सातत्याने वाढ करत आहेत. यामुळे आर्थिक संकटाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था हाताळण्यास मदत होते.