Coronavirus: Medical workers (Photo Credits: IANS)

जून 2021 पर्यंत भारतातील कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) मृत्यू झालेल्या लोकांची अधिकृत संख्या 4 लाखांवर पोहोचली आहे. परंतु ही गोष्ट संपूर्ण चित्र मांडत नाही. कदाचित परिस्थिती आणखीन वाईट असल्याचा अंदाज आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट (Centre for Global Development) याबाबत आपला अंदाज व्यक्त केला आहे. केंद्राने आपल्या अभ्यासात म्हटले आहे की, भारतामध्ये कोरोनामुळे 34 ते 49 लाख लोकांचा मृत्यू झाला असावा. हा अहवाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. हा अहवाल भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम, अमेरिकन थिंक-टँक सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंटचे जस्टिन सँडफूर आणि हार्वर्ड विद्यापीठाचे अभिषेक आनंद यांनी तयार केला आहे.

अमेरिकेतील या अभ्यासानुसार, जानेवारी 2020 ते जून 2021 या काळात भारतात कोविड-19 मुळे जवळजवळ 50 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. ग्लोबल डेव्हलपमेंट सेंटरने अहवालात भारतातील मृत्यूच्या अंदाजाच्या तीन रूपरेषा तयार केल्या आहेत. या सर्व भारतातील अधिकृत मृत्यूची संख्या चार लाखाच्या दहा पट जास्त असल्याचे दर्शवतात. अहवालात असेही म्हटले आहे की, देशात कोरोनाची पहिली लाट अत्यंत धोकादायक होती. या वर्षाच्या अखेरीस (जेव्हा दुसरी लाट सुरू झाली) भारतातील कोविडमुळे मृत्यूची संख्या 1.50 लाख होती.

परंतु असे असूनही त्या लाटेत 20 लाख लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. ऑक्सिजन, बेड आणि लसांच्या अभावामुळे दुसऱ्या लाटेमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला, परंतु मार्च 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीतील पहिल्या वेव्हचा डेटा रिअल टाइममध्ये गोळा केला गेला नाही. त्या काळात मृत्यू झालेल्या लोकांची संख्या दुसर्‍या लाटेप्रमाणेच भयानक असू शकते. आजही देशातील फक्त सात टक्के लोकसंख्येचेच संपूर्ण लसीकरण झाले आहे. ऑगस्टमध्ये तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज भारतातील वैज्ञानिकांनी वर्तविला आहे. (हेही वाचा: Bird Flu: बर्ड फ्लू आजाराने घेतला 2021 मधील पहिला बळी, 11 वर्षीय मुलाचा AIIMS रुग्णालयात मृत्यू)

अभ्यासात असे म्हटले आहे की, भारतातील कोरोनाची दुसरी लाट ही फाळणीनंतरची सर्वात मोठी मानवी शोकांतिका आहे. हा अभ्यास सेरो सर्वेक्षण, घरगुती डेटा आणि अधिकृत डेटावर आधारित आहे. यामुळे पुन्हा एकदा भारतात कोरोना मृत्यूच्या अंडर रिपोर्टिंगकडे लक्ष वेधले आहे. ब्राऊन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे डीन प्रोफेसर आशिष झा यांचे म्हणणे आहे की, भारत कोविडची चाचणी घेण्यात आणि संसर्ग ओळखण्यात अपयशी ठरला आहे.