देशभरातील हवामान मोठ्या प्रमाणावर बदलत आहे. ज्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rainfall), दाट धुके (Fog Alerts North India) आणि हवेची गुणवत्ताही खालावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीने वर्तवलेल्या हवामान अंदाज (IMD Weather Updates) वर्तवताना म्हटले आहे की, भारतातील काही राज्यांमध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेंसह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. शिवाय, राजधानी दिल्लीमध्ये हवेची गुणवत्त 'प्रचंड खराब' या श्रेणीत पोहोचल्याने शहरात दाट धुके निर्माण झाले आहे. नागरिकांना श्वसनाशी संबंधित समस्या निर्माण झाल्या आहेत.
दक्षिण भारतात पावसाचा अंदाज
आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार 25 ते 28 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकलमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर निकोबार बेटांवर आज तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीच्या सूचनेनुसार, केरळ, माहे, किनारपट्टी आंध्र प्रदेश, यानम आणि रायलसीमामध्येही 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी मुसळधार पाऊस पडू शकतो.
उत्तर भारतासाठी दाट धुक्याचा इशारा
पंजाब, हरियाणा आणि चंदीगडच्या काही भागात 28 आणि 30 नोव्हेंबरच्या पहाटे दाट धुके राहण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात 27 ते 29 नोव्हेंबर दरम्यान धुक्याची स्थिती राहण्याची शक्यता आहे, तर उत्तर प्रदेशात 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान अशीच परिस्थिती उद्भवू शकते. (हेही वाचा, Cyclone Biparjoy in Mumbai: मुंबई मध्ये बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर NDRF ने दाखल केल्या अजून 2 टीम्स)
देशाच्या बहुतांश भागात किमान तापमान पुढील पाच दिवस स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. हरियाणातील हिसार आणि राजस्थानमधील सीकर येथे मैदानी भागातील सर्वात कमी तापमान 8.0 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
हवामान प्रणालीचा मोठा प्रभाव
वातावरणातील बदल, चक्रीवादळ आदी कारणांमुळे पूर्व विषुववृत्तीय हिंदी महासागर आणि आसपासच्या प्रदेशांवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ही प्रणाली 25 नोव्हेंबरपर्यंत बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-मध्य भागातही कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतरीत होण्याची शक्यता आहे आणि येत्या काही दिवसांत ती वायव्येकडे तामिळनाडू-श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता आहे.
अफगाणिस्तान आणि शेजारच्या प्रदेशांवर चक्रीवादळ परिसंचरण म्हणून पश्चिम विक्षोभ सक्रिय आहे, ज्याचा परिणाम उत्तर भारताच्या हवामानावर होत आहे.
मच्छीमारांसाठी इशारा
वादळी हवामानामुळे आणि वाऱ्याचा वेग ताशी 55 किमीपर्यंत पोहोचल्यामुळे मच्छिमारांना 26 नोव्हेंबरपर्यंत अंदमान समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान आग्नेय बंगालचा उपसागर, तामिळनाडूची किनारपट्टी, मन्नारचे आखात आणि जवळपासच्या भागातही अशीच परिस्थिती अपेक्षित आहे.
दिल्लीत किमान आणि कमाल तापमानात किंचित वाढ झाली असून 25 आणि 26 नोव्हेंबरला आकाश स्वच्छ राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तथापि, राष्ट्रीय राजधानी प्रदेशातील हवेची गुणवत्ता ही एक मोठी चिंता आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) शनिवारी दिल्लीचा सरासरी एक्यूआय 412 नोंदवला, जो 'गंभीर' वायू प्रदूषण दर्शवतो. वजीरपूर हे 440 च्या एक्यूआयसह सर्वात प्रदूषित क्षेत्र होते. रविवारी सकाळी, आनंद विहारमध्ये एक्यूआय 330 नोंदला गेला, तर पंजाबी बागमध्ये 296 नोंदला गेला, ज्यामुळे हवेची गुणवत्ता 'खराब' दर्शवते. मुसळधार पाऊस, धुके आणि हवेची गुणवत्ता खालावणे यासह प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे प्रभावित भागातील रहिवाशांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.