Delhi High Court On Husband-Wife and Other Woman: पत्नी प्रदीर्घ काळ दूर असताना पतीने जर अन्य कोणत्या महिलेच्या सहवासात राहात असेल किंवा राहू लागला तर त्याला क्रूरता म्हणता येणार नाही, असा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) दिला आहे. जोडप्याने जर घटस्फोटासाठी अर्ज केला असेल किंवा शांततामय मार्गाने दोघे पुन्हा एकत्र येण्याची सूतराम शक्यता वाटत नसेल आणि अशा प्रकरणामध्ये सदर पती वेगळ्या महिलेसोबत राहात असेल तर त्याला क्रूरता मानता येणारनाही, असेही कोर्टाने म्हटले. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने हे मत नोंदवले.
पती पत्नी प्रदीर्घ काळ एकमेकांपासून विभक्त राहात असतील तर दरम्यानच्या कालावधीत पतीला कदाचित दुसर्या स्त्रीसोबत राहून शांतता मिळाली असेल आणि यामुळे तो पत्नीपासून घटस्फोट घेण्यापासून वंचित होऊ शकत नाही, असेही कोर्टाने म्हटले.
कोर्टाने एका प्रकरणात सुनावणी करताना म्हटले की, घटस्फोटाची याचिका प्रलंबित आहे. जोडप्याला दोन मुलेही आहेत आणि अशा स्थितीत पती वेगळ्या महिलेसोबत राहतो आहे, हे जरी मान्य केले तरी या प्रकरणात पक्षकाराने केलेल्या कृतीला क्रुरता म्हणता येणार नाही. कारण जोडप्यातील पती पत्नी तब्बल 2005 पासून विभक्त आहेत. तसेच, त्यांच्यात पुन्हा एकत्र येण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे सहाजिकच दुसऱ्या महिलेसोबत राहून त्याला जर आरामदायी वाटत असेल तर त्याला क्रुरतेच्या आधारावर घटस्फोट घेण्यापासून वंचित करता येणार नाही. कारण घटस्फोटाची याचिका प्रलंबीत असतानाच्या काळानंतर बऱ्याच उशीरा घडलेली ही घटना आहे.
हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कलम 13(1)(ia) अंतर्गत क्रूरतेच्या कारणास्तव पतीला घटस्फोट देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी एका महिलेची याचिका न्यायालयाने फेटाळली. या घटनेमध्ये 3 डिसेंबर 2003 रोजी या जोडप्याचे लग्न झाले होते. मात्र, अल्पावधीतच त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि 2005 मध्ये ते परस्परांपासून वेगळे राहू लागले.
पतीने कोर्टात सांगितले की, पत्नीने वैवाहिक जीवनामध्ये प्रचंड त्रास दिला. तिने माहेरच्या लोकांना आणून मारहाणही केली. कोर्टाच्या निदर्शनात असेही आणून देण्यात आले की, पत्नी आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 506(II) अंतर्गत गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर पत्नीच्या आईने मुलगा व्हावा यासाठी पत्नीला काही औषधेही दिली होती. परंतू, त्यामध्ये तिचा गर्भपात व्हावा हा हेतू होता. कारण ती औषधे गर्भपाताचीच होती. कोर्टाने सर्व बाजू ऐकून घेतल्यावर हा निर्णय दिला.