Household Savings (Photo Credit : Pixaby)

Household Savings: आजकाल लोक सोने, रिअल इस्टेट आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक वाढवत आहेत, मात्र दुसरीकडे कर्ज घेऊन विविध गरजा भागवल्या जात आहेत. अशात लोकांवरील देणी म्हणजेच आर्थिक जबाबदारीही वाढत आहे. यामुळे त्यांची निव्वळ आर्थिक बचत (Household Savings) कमी होत आहे. गेल्या 3 वर्षांत देशभरातील कुटुंबांची आर्थिक जबाबदारी दुप्पट झाली आहे व त्यांची घरगुती आर्थिक बचत जवळपास 40% कमी झाली. ही बचत गेल्या 5 वर्षातील सर्वात कमी पातळीवर आली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केलेल्या राष्ट्रीय खाते सांख्यिकी 2024 मधून हे चित्र समोर आले आहे.

तीन वर्षांपूर्वी, 2020-21 मध्ये देशांतर्गत घरगुती बचत 23.29 लाख कोटी रुपये होती, जी 2022-23 या आर्थिक वर्षात 14.16 लाख कोटी रुपयांवर आली आहे, जी जीडीपीच्या 5.3 टक्के आणि गेल्या पाचमधील सर्वात कमी आहे. अशाप्रकारे कोरोनानंतर देशातील घरगुती बचत 9 लाख कोटी रुपयांनी कमी झाली आहे.

सांख्यिकी मंत्रालयाने म्हटले आहे की 2020-21 या आर्थिक वर्षापासून देशांतर्गत बचतीत सातत्याने घट होत आहे. 2021-22 मध्ये देशांतर्गत बचत 17.13 लाख कोटी रुपयांवर घसरली होती, जी 2022-23 मध्ये 14.16 लाख कोटी रुपयांच्या पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. याआधी, 2017-18 मध्ये देशांतर्गत बचत 13.05 लाख कोटी रुपये होती, जी 2018-19 मध्ये वाढून 14.92 लाख कोटी रुपये झाली. 2019-20 मध्ये देशांतर्गत बचत 15.49 लाख कोटी रुपये होती.

आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 2020-21 ते 2022-23 या आर्थिक वर्षात तीन पटीने वाढली आहे आणि ती 64,084 कोटी रुपयांवरून 1,79,088 कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 1,60,600 कोटी रुपये होती. शेअर्स आणि डिबेंचर्समधील गुंतवणूक जवळपास दुप्पट होऊन गेल्या वर्षी ती 2 लाख 6 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. (म्म्हेही वाचा: Hiring in India 2024: भारतामध्ये FMCG तेल-वायू आणि Hospitality क्षेत्रात एप्रिल 2024 मध्ये वाढ- रिपोर्ट)

आकडेवारीनुसार, गेल्या तीन वर्षांत देशांतर्गत बँक ॲडव्हान्स म्हणजेच कर्ज घेण्यामध्ये जोरदार वाढ झाली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात देशांतर्गत बँकांचे अग्रिम 6.05 लाख कोटी रुपये होते, जे 2021-22 मध्ये 7.69 लाख कोटी रुपये आणि 2022-23 मध्ये 11.88 लाख कोटी रुपये झाले आहे. वित्तीय संस्था आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांद्वारे घरांना दिलेली कर्जे देखील 2020-21 मधील 93,723 कोटी रुपयांवरून, 2022-23 मध्ये 3.33 लाख कोटी रुपयांपर्यंत चार पटीने वाढली आहेत. 2021-22 मध्ये ते 1.92 लाख कोटी रुपये होते. दुसरीकडे सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या स्वरूपात बचतीमध्येही वाढ झाली आहे. 2020-21 मध्ये, सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या रूपात 40,505 कोटी रुपयांची देशांतर्गत बचत झाली, जी 2022-23 मध्ये वाढून 63,397 कोटी रुपये झाली.