जर एखाद्या व्यक्तीने पहिल्या विवाहाच्या घटस्फोटानंतर विवाहाचे वचन देऊन एखाद्या स्त्रीशी संभोग केला असेल. तर त्यावर फसवणूक झाल्याचा आरोप करता येणार नाही. कारण ज्या महिलेसोबत त्याने संभोग केला होता, त्या महिलेने भविष्यातील अनिश्चितता जाणून त्याला संमती दिली होती. त्यामुळे त्या व्यक्तीला दोष देता येणार नाही, असे कोलकाता उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यासंदर्भातील एका प्रकरणात आयपीसीच्या कलम 417 अन्वये कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल फेटाळून वरच्या कोर्टाने आरोपीच्या बाजूने निकाल दिला. आरोपीने एका महिलेला त्याचे पूर्वीचे लग्न मोडल्यानंतर तिच्याशी लग्न करण्याचे वचन देऊन त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप होता.
महिलेने आरोपीविरोधात तक्रार देत खटला दाखल केला की, त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 417 आणि 376 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता. कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी आरोपीला दोषी ठरवून 10,00,000 रुपये दंड भरण्याचे आदेश दिले. यातील न 2,00,000 रुपये नुकसान भरपाई म्हणून पीडितेला आणि 8,00,000 रुपये त्याच्या शिक्षेचा भाग म्हणून राज्य सरकारच्या तिजोरीत जमा करावयाचे आदेश देण्यात आले होते. या निर्णाविरोधात आरोपीने वरच्या कलकत्ता उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
अपीलकर्त्याचे वकील बिबस्वान भट्टाचार्य यांनी कोर्टाला सांगितले की, त्याने त्याच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित, त्याच्या लग्नाबद्दल आणि त्याच्या मुलीबद्दल कोणतीही वस्तुस्थिती दडवली नाही. तक्रारदार महिला एक प्रौढ महिला असल्याने तिच्या पालकांच्या माहितीनुसार तिच्यासोबत एकत्र राहण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतला. ज्याला तिची पूर्ण संमती होती.