Farmers March in Delhi:  'अयोध्या नव्हे, कर्जमाफी पाहिजे' रामलीला मैदानावर शेतकऱ्यांची घोषणाबाजी; संसदेवर धडकणार मोर्चा
शेतकरी आंदोलन दिल्ली ( (Photo Credit: ANI)

Farmers March in Delhi: देशभरातील शेतकरी राजधानी दिल्लीतील (Delhi) रामलीला मैदानावर (Ramlila Maidan) एकत्र आले आहेत. हजारोंच्या संख्येने असलेले हे शेतकरी आज (शुक्रवार, 30 नोव्हेंबर) संसदेपर्यंत (Parliament) मोर्चा काढणार आहेत. कर्जमाफी (Debt Waiver)आणि शेतमालाला दिडपट हमीभाव मिळावा अशी या शेतकर्यांची मागणी आहे. हे सर्व शेतकरी बुधवारी संध्याकाळपासून रामलीला मैदानात दाखल होत होते. गुरुवारी रात्रीपर्यंत हजारो शेतकरी रामलीलावर जमले. अद्यापही अनेक शेतकरी येथे देशभरातून दाखल होत आहेत. हे शेतकरी सरकारच्या धोरणाविरोधात घोषणा देत आहेत. काही शेतकरी 'अयोध्या नव्हे कर्जमाफी पाहिजे', (Not Ayodhya, Need Debt Waiver)अशा घोषणा देतानाही दिसत आहेत.

राजधानी दिल्लीत कडक सुरक्षाव्यवस्था

आंदोलक शेतकऱ्यांची संख्या पाहता दिल्ली पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी रामलीला मैदाना ते संसद मार्ग परिसरात अधिक सुरक्षा तैनात केली आहे. त्याचा परिणाम या परिसरातील वाहतुकीवरही झाला आहे. काही ठिकाणची वाहतूक बंद आहे. पोलीसांनी आगोदरच स्पष्ट केले आहे की, शेतकरी मोर्चा रस्त्यावरुन जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोरी असेन. तसेच, मोर्चाच्या दोन्ही बाजूला पोलीस तैनात असतील. जेनेकरुन रस्तेवाहतुकीला अडथळा होऊ नये. शहरातील वाहतूक आणि कायदा, सुव्यवस्था कायम राहावी यासाठी 3500 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. (हेही वाचा, अखेर राम मंदिर प्रश्नावर नरेंद्र मोदी यांनी मौन सोडले; अयोध्येत राम मंदिर व्हावे अशी काँग्रेसची इच्छा नाही)

माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

दरम्यान, या शेतकरी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. यात अनेक सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. माजी पंतप्रधान आणि JDS नेते एच डी देवेगौडा (H. D. Deve Gowda) यांनीही रामलीला मैदानावर जाऊन शेतकऱ्यांची भेट गुरुवारी घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी दैवेगौडा यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत आपण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्यक्तीगत चर्चा करु असे अश्वासन दिले.

..तर नग्न होऊन आंदोलन करु

दरम्यान, तामिळनाडू (Tamilnadu) येथून आलेल्या काही शेतकऱ्यांनी धमकीचा इशारा दिला आहे की, जर त्यांना मोर्चा काढू दिला नाही तर, ते नग्न होऊन आंदोलन करतील. या मोर्चात सुमारे 10ते15 हजार शेतकरी एकत्र येतील असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. प्रत्यक्षात मात्र पोलिसांनी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा आंदोलक शेतकऱ्यांची संख्या काहीशी अधिकच असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, ही संख्या आणखी वाढण्याची शक्यताही आहे.