अखेर राम मंदिर प्रश्नावर नरेंद्र मोदी यांनी मौन सोडले; अयोध्येत राम मंदिर व्हावे अशी काँग्रेसची इच्छा नाही
पीएम मोदी आणि राहुल गांधी (File photo)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यानंतर मुंबईकडे रवाना झाले आहेत. शरुया नदीच्या आरतीनंतर, 'मंदिर बनणार नसेल तर सरकार बनणार नाही' असा इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपाला पत्रकार परिषदेत दिला. यावेळी अयोध्यामध्ये पहिल्या शिवसेना शाखेचे उदघाटन अदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी एकनाथ शिंदेंसह शिवसेना नेते आणि तेथील स्थानिक नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेना आणि भाजपाचा हिंदुत्व हा एकमेव उद्देश असल्याने उद्धव ठाकरेंनी अयोध्याला जाणं चांगलंच आहे. राम मंदिर उभारणे हा राजकारणाचा विषय नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं अयोध्येला जाणे हे युतीसाठी पोषक असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

सध्या देशभरात राम मंदिराचा मुद्दा चर्चेत असताना पंतप्रधान मोदींनी या विषयावरील आपले मौन सोडले आहे. राम मंदिराच्या निर्माणाला विलंब होण्यास काँग्रेसच जबाबदार आहे, अयोध्येत भव्य राम मंदिर व्हावे अशी काँग्रेसची इच्छा नाही, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे. राजस्‍थानमध्ये अलवर येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान बोलत होते. राम मंदिरप्रश्नी न्यायालयीन प्रक्रियेत काँग्रेस बाधा निर्माण करत आहे, असेही ते म्हणाले.

मोदी पुढे म्हणाले, 'सुप्रीम कोर्टाच्या मोठ्या मोठ्या वकिलांना काँग्रेस राज्यसभेत पाठवण्याची तयारी करत आहे. भाजपकडे राज्यसभेत बहुमत नाही. सुप्रीम कोर्टात वकील राम मंदिरांच्या मुद्दावर दबाव टाकतात. ते म्हणतात की, 2019 पर्यंत या प्रकरणावर सुनावणी होऊ नये. अशा प्रकारे राजकारण सुरु आहे.’

या पार्श्वभूमीवर अयोध्येत प्रभू श्रीराम यांची 221 मीटर उंच मूर्ती उभारण्यात येणार आहे. शरयू नदी किनारी ही मूर्ती उभारण्यात येणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. त्यासाठी, मराठी कलाकार आणि प्रसिद्ध मूर्तीकार राम सुतार यांनीच साकारलेल्या मूर्तीची प्रतिकृती वापरण्यात येणार आहे. त्यामुळे ही प्रभू श्रीराम यांची ही मूर्ती शिवस्मारकापेक्षाही उंच मूर्ती ठरणार आहे.

2019 ची निवडणूक जवळ येत असताना देशात पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा जोर धरु लागला आहे. यासंदर्भातील विश्व हिंदू परिषदेद्वारा आयोजित धर्मसभेला अयोध्येत सुरुवात झाली आहे. या निमित्ताने देशभरातून लाखो विहिंपचे कार्यकर्ते आणि हिंदू अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत.