
कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या लॉक डाऊन (Lockdown) मुळे लहान आणि मोठ्या उद्योगांवर (Small and Medium Scale Enterprises) वाईट परिणाम झाला आहे. महत्वाचे म्हणजे, या लॉकडाऊनचा परिणाम नवीन सेवा प्रदान करून, दैनंदिन जीवनाला सुखकारक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्टार्टअपवर (Startups) वर देखील झाला आहे. फार मोठी आर्थिक संकटाची वेळ त्यांच्यावर आली आहे. स्टार्टअप्ससाठी सर्वोत्कृष्ट बाजार अशी ओळख असलेल्या भारतासमोर आता असे स्टार्टअप्स वाचवणे हे आव्हान उभे राहिले आहे. नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, देशातील 38 टक्के स्टार्टअप या लॉक डाऊनमुळे पूर्णतः कंगाल झाले आहेत.
यासह 30 टक्के स्टार्टअपकडे पुढील 1 ते 3 महिन्यांपर्यंत पुरतील इतकेच पैसे शिल्लक आहेत. लॉकडाऊनमुळे या स्टार्टअपना एक कठीण आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करावा लागत आहे. हे सर्वेक्षण लोकल सर्कल्स (LocalCircles) या संस्थेने केले आहे. संस्थेने कोरोना साथीच्या आजाराचे दुष्परिणाम आणि त्यापासून बचाव करण्यासाठी राबविलेले लॉकडाउन जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या सर्वेक्षणात एकूण 28 हजार लोकांना प्रश्न विचारण्यात आले होते. त्यापैकी 8400 उद्योजक एसएमई स्टार्टअप्स क्षेत्रातील होते. या सर्वेक्षणात 16 टक्के लोकांनी असे सांगितले की, त्यांच्याकडे पुढील 3 ते 6 महिन्यांसाठीच पैसे शिल्लक आहेत. आणखी 12 टक्के म्हणाले की, त्यांच्याकडे पुढील 1 महिना पुरेल इतकेच पैसे शिल्लक आहेत. (हेही वाचा: यूपीच्या CM Helpline साठी काम करणारे BPO कोरोना व्हायरसमुळे हादरले; तब्बल 80 लोकांना Coronavirus ची लागण)
या सर्वेक्षणातील अहवालात असे म्हटले आहे की, लॉक डाऊनमुळे 4 टक्के स्टार्टअप्सनी आपला व्यवसाय बंद केला आहे. गेल्या 2 महिन्यांत बहुतेक उद्योगांची कमाई 80 ते 90 टक्क्यांनी घसरली आहे. यामुळे या उद्योगांना बाजारात आपले अस्तित्व टिकवणे अवघड झाले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने 25 मार्चपासून देशव्यापी लॉकडाउन लागू केले. 80 दिवसांपेक्षा जास्त काळ कडक नियम लागू केल्यामुळे संपूर्ण बाजार बंद पडले होते, परिणामी वस्तूंच्या मागणीत घट झाली आहे. ज्यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह मोठे उद्योग तसेच स्टार्टअप्सचे फार मोठे नुकसान झाले आहे. सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचा फायदा होण्याची अपेक्षा आहे का? असे विचारता असता, केवळ 14 टक्के लोकांनी 'होय' असे सांगितले, तर 57 टक्के लोकांनी 'नाही' असे सांगितले आणि उर्वरित 29 टक्के लोकांनी याबद्दल खात्री नसल्याचे सांगितले आहे.