
उत्तर प्रदेश सीएम हेल्पलाईन (UP CM Helpline 1076) जो लॉक डाऊन दरम्यान सातत्याने संदेश प्रसारित करत असतो की, 'कोरोना विषाणूशी (Coronavirus) संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी मुख्यमंत्री हेल्पलाईन क्र.1076 वर कॉल करा किंवा लॉकडाउन उल्लंघन आणि कोरोना विषाणूच्या संसर्गाची संशयित घटना, तातडीची वैद्यकीय व्यवस्था, आवश्यक वस्तूंचा पुरवठा आणि इतर कोणत्याही समस्यांच्या माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. आता याच सीएम हेल्पलाईन 1076 च्या बीपीओ (BPO) कंपनीतील 82 हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या प्रकरणामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.
उत्तर प्रदेशच्या या सीएम हेल्पलाईनमध्ये जवळपास आठशे कर्मचारी काम करतात, जे एक खासगी कंपनी चालवित आहेत. आतापर्यंत येथे 80 हून अधिक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या ठिकाणी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न झाल्याने व इतर बाबतीत निष्काळजी केल्याने हे घडले असावे, असे आरोग्य विभाग म्हणत आहे. लखनऊच्या सीएमओ कार्यालयाने आता या प्रकरणात काम करणाऱ्या कंपनीला नोटीस बजावली आहे. सीएमओने सुरेविन बीपीओ सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडला नोटीस दिली आहे. कंपनीवर लॉकडाऊनच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्याचा आरोप आहे. सीएमओ कार्यालयाने नोटिशीत 3 प्रमुख गोष्टी विचारल्या आहेत. (हेही वाचा: COVID19: कोरोना विषाणू विरुद्धच्या लाढाईत भारत एकत्र होता, याची इतिहास दखल घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी)
- कार्यालयात सामाजिक अंतराचे, स्वच्छते चे पालन होत होते? मास्क वापरले गेले होते? जर असे झाले नाही, तर मग हा निष्काळजीपणा का घेतला गेला?
- एकाच जास्त मोठ्या संख्येने कर्मचारी कार्यालयात का बोलावण्यात आले?
- कंपनीने कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वांचे पालन का केले नाही?
दरम्यान, उत्तर प्रदेशात वाढत्या कोरोना प्रकरणांमध्येही दिलासा मिळाल्याची बातमी समोर आली आहे. यूपीमधील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट सतत वाढत आहे, म्हणजे येथे जास्तीत जास्त रुग्ण बरे होत आहेत. सरकारच्या आकडेवारीनुसार, आता उत्तर प्रदेशात रिकव्हरी रेटचे प्रमाण 61 टक्क्यांहून अधिक झाले आहे. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीशकुमार अवस्थी आणि प्रधान सचिव आरोग्य अमित मोहन प्रसाद यांनी माहिती दिली की, सध्या उत्तर प्रदेशात कोरोनाची सक्रिय घटनांची संख्या 5064 आहे. राज्यात आतापर्यंत 8610 कोरोनाचे रुग्ण घरी गेले आहेत, अशा प्रकारे राज्याचा रिकव्हरी रेट 61.10% आहे.