पोप फ्रान्सिस यांच्याकडून Devasahayam Pillai यांना 'संत' पदवी बहाल; व्हॅटिकनद्वारे हा मान मिळवणारे पहिले भारतीय 
Devasahayam Pillai (संग्रहित संपादित प्रतिमा)

पोप फ्रान्सिस (Pope Francis) यांनी रविवारी, 15 मे रोजी व्हॅटिकन येथे देवसहयाम पिल्लई (Devasahayam Pillai) यांना संत (Saint) ही पदवी प्रदान केली. पिल्लई यांनी 18 व्या शतकात ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. एखाद्या पोपकडून संत म्हणून घोषित केले गेलेले देवसहयाम हे पहिले भारतीय आहेत. पिल्लई यांच्यासोबत इतर 9 जणांना संत ही पदवी प्रदान करण्याचा कार्यक्रम रविवारी व्हॅटिकनमध्ये आयोजित करण्यात आला. वेळापत्रकानुसार पोप फ्रान्सिस यांनी रविवारी दुपारी 2.30 वाजता सेंट पीटर्स बॅसिलिका येथे या समारंभाचे नेतृत्व केले.

कोट्टर धर्मक्षेत्र, तामिळनाडू बिशप्स कौन्सिल आणि भारताच्या कॅथोलिक बिशप परिषदेच्या विनंतीवरून 2004 मध्ये देवसहयाम यांना संत म्हणून घोषित करण्याच्या प्रक्रियेची शिफारस करण्यात आली होती. पिल्लई यांच्या चमत्कारिक परोपकारी कार्यांना पोप फ्रान्सिस यांनी 2014 मध्ये मान्यता दिली होती. यामुळे त्यांना (पिल्लई) 2022 मध्ये संत घोषित करण्याचा मार्ग मोकळा झाला. पिल्लई यांनी 1745 मध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर स्वतःचे नाव 'लाजरस' ठेवले.

देवसहयाम यांचा जन्म 23 एप्रिल 1712 रोजी हिंदू नायर कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव नीलकंठ पिल्लई. ते तत्कालीन त्रावणकोर राज्याचा भाग असलेल्या कन्याकुमारी येथील नट्टालम येथील रहिवासी होते. ते त्रावणकोरचे महाराजा मार्तंड वर्मा यांच्या दरबारात कर्मचारी होते. डच नेव्हीच्या कमांडरने त्यांना कॅथलिक धर्मात दीक्षा दिली. (हेही वाचा: मदर तेरेसा यांनी लपवली चर्चमधील वाईट कृत्ये आणि घोटाळे; नव्या डॉक्युमेंटरीमध्ये धक्कादायक खुलासा)

व्हॅटिकनने तयार केलेल्या एका नोटमध्ये म्हटले आहे की, ‘प्रचार करताना, त्यांनी जातीभेद लक्षात न घेता सर्व लोकांच्या समानतेवर विशेष भर दिला. यामुळे उच्च वर्गात द्वेष निर्माण झाला आणि 1749 मध्ये त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या वाढत्या अडचणींच्या दरम्यान त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. 14 जानेवारी 1752 रोजी त्यांना हुतात्मा दर्जा मिळाला.’ त्याच्या जन्मानंतर 300 वर्षांनी 2 डिसेंबर 2012 रोजी कोट्टरमध्ये देवसहयाम यांना ‘धन्य’ घोषित करण्यात आले. धन्य घोषित करणे म्हणजे संतपद बहाल करण्याच्या दिशेने पहिले पाऊल होय.