Arrested | (File Image)

गुरुग्राममध्ये सायबर फसवणुकीच्या (Cyber Fraud) आरोपाखाली एका 27 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. वर्क फ्रॉम होम (WFH) द्वारे लोकांना पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने 6 महिन्यांत सुमारे 21 कोटी रुपयांची फसवणूक केली. हा व्यक्ती ऑनलाइन फसवणुक करण्यापूर्वी भाजीपाला विकायचा, परंतु कोविड-19 महामारीमुळे त्याचा व्यवसाय बंद पडल्याने त्याने गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला. ऋषभ शर्मा असे आरोपीचे नाव असून तो सेक्टर-9 मधील रहिवासी आहे. शर्मा याच्यावर 10 राज्यांत फसवणुकीचे 37 गुन्हे दाखल आहेत. याशिवाय अन्य 855 प्रकरणांमध्ये तो सहआरोपी आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंड पोलिसांच्या पथकाने ऋषभला 28 ऑक्टोबर रोजी पैसे हस्तांतरित करण्यासाठी पीडितांना प्रदान केलेल्या बँक खात्यांचा शोध घेतल्यानंतर अटक केली. ऋषभने परदेशातील कार्टेलसाठी काम केले आणि हवाला आणि क्रिप्टोकरन्सीद्वारे चीन, सिंगापूर आणि हाँगकाँगसारख्या देशांमध्ये पैसे पाठवले या आरोपाचाही पोलीस तपास करत आहेत. त्याने सहा महिन्यांपूर्वीच फसवणूक करण्यास सुरुवात केली आणि या कालावधीमध्ये तब्बल 21 कोटी रुपये गोळा केले. यातील बहुतांश पैसा आंतरराष्ट्रीय टोळ्यांकडून मिळणाऱ्या प्रचंड कमिशनमधून आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी ऋषभ फरिदाबादमध्ये भाजीपाला आणि फळे विकायचा. इतर व्यावसायिकांप्रमाणेच त्याचेही कोरोना महामारीमध्ये मोठे नुकसान झाले आणि त्याला व्यवसाय बंद करावा लागला. यानंतर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याने वर्क फ्रॉम होमवर काही काम केले. यावेळी त्याची भेट त्याच्या एका जुन्या मित्राशी झाली, जो आधीपासून ऑनलाइन फसवणुकीत गुंतला होता. त्यानंतर या दोघांनी लोकांना कॉल करून त्यांना नोकरी देण्याचे आमिष दाखवले व त्याद्वारे फसवणूक केली. (हेही वाचा: Snake Venom at Rave Party: नोएडामध्ये रेव्ह पार्टीसाठी सापाचे विष पुरवल्याप्रकरणी Elvish Yada सह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पाच जणांना अटक; न्यायालयाने सुनावली 14 दिवसांची कोठडी)

याप्रकरणी डेहराडूनचे डीसीपी (सायबर पोलीस) अंकुश मिश्रा यांनी सांगितले की, आरोपींनी फसवणूक करत अवघ्या सहा महिन्यांत 21 कोटी रुपये कमावले. ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी, ऋषभला त्याच्या मित्राने कॉल करण्यासाठी फोन नंबरचा डेटाबेस आणि लोकांना नोकरीची ऑफर पटवून देण्यासाठी काही टिप्स प्रदान केल्या. ऋषभ लोकांना फोन करून त्यांना घरून काम करण्यायोग्य किंवा अर्धवेळ नोकरीची खोटी ऑफर द्यायचा. त्याचा शेवटचा बळी डेहराडूनमधील एक व्यापारी होता, ज्याची 20 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.

ऋषभने मॅरियट बोनवॉय हॉटेलच्या वेबसाइटसारखी दिसणारी बनावट वेबसाइट तयार करत होती. या हॉटेल गटासाठी रिव्ह्यू लिहिण्यासाठी त्याने अर्धवेळ नोकरीची ऑफर दिली. तसेच काही लोकांना हॉटेलमध्ये काम देण्याचे आमिष दाखवले गेले. यासाठी पीडितांना सुरुवातीला 10,000 रुपये देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मोठ्या परताव्याची हमी देऊन त्यांना अधिक गुंतवणूक करण्यास पटवून दिले. मात्र या लोकांनी भरपूर पैसे गुंतवल्यावर ऋषभ गायब झाला. आता पोलिसांनी ऋषभवर फसवणूक आणि इतर गुन्हे दाखल केले आहेत. हा घोटाळा इतर देशांतील गुन्हेगारी गटांशी संबंधित असल्याचे त्यांना आढळले. हे गट चोरीचे पैसे इतर देशांमध्ये गुप्तपणे पाठवत असत.