नोएडा आणि एनसीआरच्या इतर शहरांमध्ये रेव्ह पार्ट्या (Rave Party) आयोजित करून नशेसाठी सापाचे विष (Snake Venom) पुरवल्याबद्दल आणि अशा पार्ट्यांमध्ये परदेशी मुलींना आमंत्रित केल्याबद्दल प्रसिद्ध यूट्यूबर आणि बिग बॉस विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) याच्यासह सहा व्यक्तींविरुद्ध सेक्टर-49 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 5 आरोपींना अटक केली गेली आहे. अटक केलेल्या आरोपींना सूरजपूर न्यायालयात हजर करण्यात आले. तेथून न्यायालयाने पाचही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी अजून एल्विश यादवला अटक झालेली नाही.
एल्विश यादववर रेव्ह पार्टी आयोजित करून त्यासाठी सापांची तस्करी केल्याचा आरोप आहे. भाजप खासदार मनेका गांधी यांच्याशी संबंधित असलेल्या पीएफए या संस्थेने केलेल्या स्टिंग ऑपरेशनद्वारे ही बाब उघड झाली आहे. खुद्द पीएफएने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आरोपींकडून 9 साप जप्त करण्यात आले आहेत, यासह 20 मिलीलीटर सापाचे विषही सापडले. नोएडाचे वन अधिकारी प्रमोद श्रीवास्तव यांनी सांगितले की, रेव्ह पार्ट्यांमध्ये नशेसाठी सापाच्या विषाचा वापर केला जातो. ही युट्युबर्सची टोळी आहे, जी अशा पार्ट्या आयोजित करते.
एल्विश यादव आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध नोएडातील सेक्टर-49 कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये विषारी सापांची तस्करी आणि बेकायदेशीर रेव्ह पार्ट्या आयोजित केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भाजप खासदार मनेका गांधी यांच्या पीपल फॉर अॅनिमल्स या संस्थेत काम करणाऱ्या गौरव गुप्ता यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा आरोप आहे की, एल्विश यादव नोएडा आणि एनसीआरच्या फार्म हाऊसमध्ये जिवंत सापांसह व्हिडिओ शूट करतो याशिवाय रेव्ह पार्ट्यांमध्येही सापाच्या विषाचा वापर केला जातो.
#WATCH | Noida: FIR against six, including Elvish Yadav, in snake venom case in UP | Arrested accused before the Surajpur Court. The court sent the five accused to 14 days of judicial custody. pic.twitter.com/dg8Proa0fu
— ANI (@ANI) November 3, 2023
याबाबत गौरव गुप्ता सांगतात, रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाचा वापर होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. माहितीवरून आमच्या एका इन्फॉर्मरने या संपूर्ण प्रकरणाबाबत एल्विश यादव याच्याशी संपर्क साधला आणि त्याला नोएडामध्ये रेव्ह पार्टी आयोजित करून साप आणि कोब्राच्या विषाची व्यवस्था करण्यास सांगितले. त्यावर त्याने त्याचा एजंट राहुलचे नाव सांगून त्याचा मोबाईल नंबर दिला आणि माझे नाव घेऊन या व्यक्तीशी बोला, असे सांगितले. त्यानंतर राहुलशी संपर्क साधल्यावर त्याने जिवंत सापांचा पुरवठा केला. (हेही वाचा: Snake Venom Supply Case: सापाचं विष पुरवठ्या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी माजी केंद्रीय मंत्री Maneka Gandhi यांची मागणी)
गुन्हा दाखल झाल्यानंतर एल्विश यादवचे म्हणणे समोर आले आहे. एक व्हिडिओ पोस्ट करून एल्विशने आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी मी यूपी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. यूपी पोलीस आणि यूपी सरकारने योग्य तपास करावा व केलेले आरोप खरे ठरले तर मी संपूर्ण जबाबदारी घेण्यास तयार आहे, असे तो म्हणाला.