Cyber Fraud Alert: 15 दिवसांत पैसे डबल करण्याचे आमिष; अॅपद्वारे फ्रॉडरने लंपास केले तब्बल 250 कोटी
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

कोविड-19 लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन व्यवहारांना अधिक गती मिळाली. मात्र त्यामुळे फसवणूकीचे प्रकारही वाढले आहे. ऑनलाईन फसवणूकीची अशीच एक घटना उत्तराखंड (Uttarakhand) येथून समोर येत आहे. 15 दिवसांत पैसे डबल करुन देण्याचे आमिष दाखवून त्यांनी आतापर्यंत 250 कोटी रुपये लंपास केले आहेत. या प्रकरणी उत्तराखंड पोलिसांनी फसवणूकीचा सुत्रधार पवन पांडेय (Pawan Pandey) याला नोएडा येथील सेक्टर 99 येथून अटक केली आहे. (Online Fraud: ब्लॅक फंगस इंजेक्शन विक्रीच्या नावाखाली हैद्राबाद येथील व्यक्तीला तब्बल 8 लाखांचा गंडा)

फसवणुकीसाठी फ्रॉडरने पावर बँक (Power Bank) नावाच्या एका अॅपचा वापर केला. याद्वारे त्यांनी केवळ 4 महिन्यात नागरिकांना सुमारे 250 कोटी रुपयांना चुना लावला आहे. या अॅप द्वारे 15 दिवसांना पैसे डबल करण्याचे आमिष लोकांना दाखवले जायचे. विशेष म्हणजे देशातील तब्बल 50 लाख लोकांनी हा अॅप डाऊनलोड केला होता. या जाळ्यात रोहित कुमार नामक व्यक्तीही अडकला. फ्रॉडर्सने रोहित कुमारचे तब्बल 91,200 रुपये लंपास केले. पैसे डबल न झाल्याने रोहितने उत्तराखंड एसटीएफ मध्ये याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

मिळालेले पैसे आरोपीने वेगवेगळ्या बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले असल्याचे तपासातून समोर आले. तसंच आतापर्यंत त्याने 250 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचेही पोलिसांच्या चौकशीतून समोर आले. आरोपी पवन पांडेय कडून पोलिसांनी 10 लॅपटॉप, 592 सिम कार्ड, 5 मोबाईल फोन, 4 एटीएम आणि 1 पासपोर्ट जप्त केला आहे. यात चायनीज गँगचा देखील सहभाग असल्यासचे उघडकीस आले आहे.

दरम्यान, परदेशी व्यापाऱ्यांद्वारे भारतातील बँक खात्यांच्या माध्यमातून फसवणूकी केली जात असल्याचा खुलासा एडीजी अभिनव कुमार यांनी केला आहे. याप्रकरणी अन्य तपास एजन्सी आयबी आणि रॉ ला देखील सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच यात ज्या परदेशी नागरिकांची नावे समोर आली आहेत त्या देशातील दूतावासांकडून त्या व्यक्तींची माहिती मागवण्यात येत आहे. याप्रकरणी लवकरच सर्व माहिती आपल्या समोर येईलच. आतापर्यंत या प्रकरणी उत्तराखंडमध्ये 2, बंगळुरुमध्ये एक केस दाखल झाली आहे.