Online Fraud: ब्लॅक फंगस इंजेक्शन विक्रीच्या नावाखाली हैद्राबाद येथील व्यक्तीला तब्बल 8 लाखांचा गंडा
Fraud (Photo Credits: File Image)

हैद्राबाद (Hyderabad) मधील सायबराबाद (Cyberabad) येथून ऑनलाईन फसवणूकीची (Online Fraud) एक मोठी घटना समोर येत आहे. ब्लॅक फंगस (Black Fungus) इंजेक्शन विक्रीच्या नावे एका व्यक्तीला तब्बल 8 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, हा व्यक्ती गचीबोवली (Gachibowli) चा रहिवासी असून ब्लॅक फंगस वरील इंजेक्शनची उपलब्धता पाहण्यासाठी इंटरनेटवर सर्च करत होता. त्यावेळेस त्याला Emson Medical Stores चे नाव आणि संपर्क क्रमांक मिळाला. त्यानंतर त्याने व्हॉट्सअॅपद्वारे त्यांना संपर्क केला. तेव्हा पेमेंट केल्यानंतर इंजेक्शन कुरियरने पाठवण्यात येईल, असे फसवणूक झालेल्या व्यक्तीला सांगण्यात आले.

इंजेक्शन उपलब्ध असल्याची खात्री केल्यानंतर त्याने 60 कुप्यांसाठी 8.32 लाखांचे ऑनलाईन पेमेंट केले. फ्रॉडरने दिलेल्या बँक अकाऊंटवर हे पेमेंट करण्यात आल्यानंतर पलिकडून काहीच प्रतिक्रीया आली नाही. त्यानंतर व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याचे समजले आणि त्याने तक्रार दाखल केली.

अशा प्रकारची घटना बंगळुरु मधून काही दिवसांपूर्वी समोर आली होती. 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरला ब्लॅक फंगसचे इंजेक्शन देण्याच्या नावाखाली 79,000 रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. याविरुद्ध त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. (Online Financial Frauds Helpline Number: दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्रलयाने ऑनलाईन आर्थिक फसवणूकीत पैसे गमावलेल्यांसाठी लॉन्च केला खास हेल्पलाईन नंबर!)

कोविड-19 च्या संकटात ब्लॅक फंगस इंफेक्शनने डोके वर काढले आहे. त्यातच औषधांचा तुटवडा यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. संपूर्ण मानव जातीवर ओढावलेल्या या गंभीर संकटात लोकांच्या गरजेचा, हतबलतेचा फायदा घेत त्यांची फसवणूक करण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. या घटना नक्कीच अमानुष आहेत. मात्र आपली फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी अधिक सतर्क होण्याची गरज आहे. तसंच फसवणूक झाल्यास सायबर पोलिसांची मदत घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.