COVID-19 Vaccine: प्रत्येक भारतीयाची गरज पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार सक्षम; देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या अदर पूनावाला यांचे ट्विट
Adar Poonawalla (PC - PTI)

भारताची लस निर्मितीची क्षमता ही खूप चांगली असून कोविड-19 (Covid-19) विरुद्ध लढण्यासाठी संपूर्ण जगाला त्याची मदत होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले. मोदींच्या या वक्तव्यावर आभार मानत सीरम इंस्टीट्युट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) सीईओ अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी प्रत्येक भारतीयाची गरज पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार सक्षम असल्याचे म्हटले आहे. दरम्यान काल त्यांनी लस पुरवण्यासाठी देशाकडे आर्थिक पाठबळ आहे का? असा सवाल उपस्थित केला होता. मात्र आज त्यांनी मोदींच्या ट्विटला रिट्विट करत मोदी सरकारचे कौतुक केले आहे.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आम्ही तुमच्या जागतिक स्तरावर लस पुरवण्याच्या ध्येयाचे स्वागत करतो. तुमच्या नेतृत्व आणि पाठींब्याबद्दल धन्यवाद. तुमच्या सर्व योजना प्रत्येक भारतीयाची गरज पूरवण्यासाठी सक्षम ठरेल, हे स्पष्ट आहे," अशा आशयाचे ट्विट सीरम इंस्टीट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांनी केले आहे. (COVID-19 Vaccine Update: पुढच्या एका वर्षात कोरोना लसीवर खर्च करण्यासाठी सरकारकडे 80 हजार कोटी रुपये आहेत का? अदर पूनावाला यांचा सवाल)

पहा ट्विट:

जगातील सर्वाधिक लस उत्पादन करण्याचा देश असल्यामुळे भारतात होणाऱ्या लसीचे उत्पादन आणि ते पोहवण्याची क्षमतामुळे जगभरातील कोविड-19 विरुद्ध लढणाऱ्या देशांना त्याची मदत होईल. त्याचप्रमाणे लस साठवण करण्याची क्षमता आणि कोल्ड चेनसाठी भारत इतर देशांनाही मदत करेल. इतर विकसनशील देशांना लसीच्या पुरवठ्यासाठी भारत मदत करणार आहे, असे  पंतप्रधान मोदींनी  युएन जनरल असेंबलीच्या उच्चस्तरीय बैठकीत सांगितले.

दरम्यान, प्रत्येक भारतीयाला कोरोना लस  पुरवण्यासाठी  भारत सरकारकडे 80 हजार कोटी पुढच्या वर्षभरासाठी उपलब्ध आहेत का? असा सवाल काल आदर पुनावाला यांनी उपस्थित केला होता. तसंच देशासमोर हे मोठे आव्हान आहे, असेही ते म्हणाले होते.

सीरम इंस्टीट्युट सध्या AstraZeneca-Oxford लसीच्या क्लिनिकल ट्रायल्स भारतात करत आहे. तसंच आम्हाला भारत आणि परदेशात लस उत्पादकांना यासंदर्भात योजना आणि मार्गदर्शन करायचे आहे. लस खरेदी आणि वितरण्याच्या दृष्टीने देशाची गरज पूर्ण करायची आहे, म्हणून मी असा प्रश्न विचारत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.