Covid 19 Vaccination: लसीकरणासाठी अधिक महिलांना पुढे आणण्याची गरज – नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल
Covid 19 Vaccination | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसारच्या लसीकरणाच्या पहिल्या दिवशी, सोमवारी (21 जून 2021) देण्यात आलेल्या लसीच्या एकूण मात्रांपैकी 63.68% मात्रा ग्रामीण भागात देण्यात आल्या आहेत. त्या दिवशी देण्यात आलेल्या मात्रांपैकी 56.09 लाख मात्रा ग्रामीण लसीकरण केंद्रातून देण्यात आल्या तर शहरी भागात 31.9 लाख लोकांनी लस घेतली. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल यांनी मंगळवारी नवी दिल्लीत कोविड -19 संदर्भातल्या पत्रकार परिषदेत ही महिती दिली. लसीकरणासाठी ग्रामीण भागावर भर देण्यात येत आहे. ग्रामीण भागात लसीकरण व्याप्ती तीव्र असून उत्तम प्रमाणात असल्याचे त्यांनी सांगितले. सोमवार, 21 जून 2021 पासून, देशातल्या ग्रामीण - शहरी लोकसंख्या विभागणीच्या प्रमाणात लसीकरणाचे आकडे असल्याचे ते म्हणाले. ग्रामीण आणि दुर्गम भागापर्यंत लसीकरण अभियान नेणे शक्य असल्याचे यावरून सिद्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.

71 टक्के लसीकरण केंद्रे ही ग्रामीण भागात असून गेल्या काही आठवड्यात झालेल्या लसीकरणापैकी अर्ध्याहून जास्त लसीकरण ग्रामीण भागात झाल्याची माहिती त्यांनी दिली. माहीती तंत्रज्ञान प्रणालीच्या वापरात वाढ, लसीकरणासाठी त्याच्या वापराबाबत लोकांना माहिती आणि जनतेने त्याचा केलेला स्वीकार यामुळे ग्रामीण भागापर्यंत अधिक लसीकरण पोहोचत असून संपूर्ण ग्रामीण भागात लसीकरण शक्य असल्याचा विश्वास आम्हाला आहे. सोमवारी एवढ्या मोठ्या प्रमाणात (88.09लाख) मात्रा देण्यात येऊनही कोविन मंचावर कोणताही अडथळा आला नव्हता असे त्यांनी नमूद केले.

लसीकरणाच्या नव्या अभियानात सरकारी केंद्रांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी सांगितले. 21 जून 2021 ला देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांपैकी 92 टक्के मात्रा सरकारी केंद्रातून देण्यात आल्या. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची व्याप्ती आणि सामर्थ्य यातून प्रतीत होत आहे. कोविड-19 लसीकरणासाठी, सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा अनुभव महत्वाचा ठरल्याचे ते म्हणाले.

काल लस घेतलेल्यांमध्ये 46 टक्के महिला तर 53 टक्के पुरुष होते. ज्या ठिकाणी लसीकरणातला हा स्त्री-पुरुष असमतोल आहे तो दूर करण्याची गरज असून अधिक महिलांना लसीकरणासाठी पुढे आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.