कोरोना व्हायरसशी (Coronavirus) लढण्यासाठी सरकारने लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केले आहे, ज्याची मुदत 14 एप्रिलपर्यंत आहे. परंतु आता हा प्रश्न उद्भवत आहे की, या दिवशी लॉकडाउन नक्की संपेल? की पुन्हा ते वाढविण्यात येईल? का देशातील काही भागांना यापासून मुक्तता देण्यात येईल. या लॉक डाऊनबाबत सरकार लवकरच काही निर्णय घेईलच मात्र, कोरोनोमुळे लागलेल्या या लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहे. वित्त मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्याच्या अंदाजानुसार भारताचा दैनिक जीडीपी (GDP) सुमारे 8 अब्ज डॉलर्स आहे. जर लॉक डाऊन 30 दिवस केले तर या काळात देशाचे सुमारे 250 अब्ज डॉलर्सचे नुकसान होईल.
सरकारकडून मिळत असलेले संकेत पाहता, 14 एप्रिलनंतरही देशातून लॉक डाऊन हटवले जाणार नाही असे दिसत आहे. पंतप्रधान निवास, मंत्रिमंडळाची बैठक, राज्य सरकारची बैठक याद्वारे देशात थोडे थोडे लॉक डाऊन हटवता येऊ शकते असे संकेत मिळत आहेत. यासाठी टाइमलाइन तयार केली जाईल, जी अद्याप जाहीर केलेली नाही. नरेंद्र मोदी सरकारच्या एका ज्येष्ठ मंत्र्यांनी इंडिया टुडेला सांगितले की, सरकार तर्कशुद्ध लॉकडाऊनच्या संकल्पेनावर विचार करत आहे. (हेही वाचा: कोरोना ग्रस्त व्यक्ती लॉकडाऊन मध्ये राहिली नाही तर, 30 दिवसांत 406 लोकांना करू शकते संक्रमित)
सरकारचा असा अंदाज आहे की, लॉक डाऊनमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे, परंतु लॉकडाऊनमुळे लोकांचे आणि अर्थव्यवस्थेचे गंभीर नुकसान झाले आहे. जर लॉक डाऊन लवकर हटवले, तर 2020-21 या आर्थिक वर्षात ही हानी भरून काढली जाऊ शकते. परंतु लॉकडाउन दीर्घकाळ राहिल्यास त्याची पुनर्प्राप्ती करणे अशक्य होईल. दीर्घकाळ लॉकडाउन राहिल्यास भारताची वाढ 3 टक्क्यांच्या खाली जाऊ शकते, असे केपीएमजीने म्हटले आहे.