7D Theatre (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन भारतातील सिनेमागृहे (Cinema Theatres) पूर्णपणे बंद होती. मात्र अनलॉकच्या टप्प्यात ती 50% क्षमतेने सुरु करण्यात आली. मात्र यात प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून आता कोरोनाची लस आल्यानंतर देशातील अनेक गोष्टी पूर्वपदावर येण्याच्या तयारीत आहेत. त्यात आता भारतातील सिनेमागृहे 100% क्षमतेने सुरु होणार असे सांगण्यात येत आहे. मात्र त्यासाठी सरकारकडून काही गाईडलाईन्स (Guidelines) देण्यात आल्या आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन करणे हे थिएटर मालकांना तसेच तेथे येणा-या प्रेक्षकांना बंधनकारक असणार आहे.

माहिती प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या एसओपीअंतर्गत निर्जंतुकीकरण आणि कोविड नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले गेले पाहिजे. तसेच लोकांना सिनेमागृहाच्या आतमध्ये असलेल्या स्टॉलवरून पदार्थ खरेदी करता येतील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. काही निर्बंध अजूनही घातलेले आहेत, कारण आता कोविड संपुष्टात येण्याच्या मार्गावर असला तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे.हेदेखील वाचा- Guidelines for OTT Platforms: ओटीटी, डिजिटल प्रसारमाध्यमांसाठी लवकरच नियमावली, 'तांडव' वादानंतर केंद्र सरकार कारवाईच्या विचारात- प्रकाश जावडेकर

सिनेमागृहे 100% क्षमतेने चालविण्यासाठी गाईडलाईन्स

  • सभागृहाच्या आवाराच्या आतमध्ये सर्व प्रकारच्या सुरक्षा विषयक उपायांची अंमलबजावणी काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे.
  • सामान्य मार्गदर्शक सूचनांमध्ये असे सांगण्यात आले आहे की, श्वसन विषयक शिष्टाचारांचे पालन करणे आवश्यक आहे, चेहऱ्यावर मास्क वापरणे, सभागृहात आणि बाहेर किमान 6 फूट आणि जास्तीत जास्त सामाजिक अंतर पाळणे गरजेचे आहे.
  • सार्वजनिक ठिकाणी, प्रतिक्षा कक्षांमध्ये थुंकणे प्रतिबंधित असेल आणि आरोग्य सेतूचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे.
  • सिनेमागृहात येणाऱ्या प्रत्येकाचे प्रवेशद्वाराशी आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग झाले पाहिजे. येथील गर्दी टाळण्यासाठी रांगेत उभे राहून ही प्रक्रिया पार पाडावी.
  • एक स्क्रीन किंवा अनेक स्क्रीन असलेल्या सिनेमागृहांमध्ये मध्यंतराच्या वेळी प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याच्या दाराजवळ गर्दी टाळण्यासाठी लोकांना रांगेने बाहेर पडता यावे, याकरिता पुरेसा वेळ दिला जाणार आहे.
  • गर्दी टाळण्यासाठी मल्टिप्लेक्स सिनेमागृहांमध्ये सिनेमा प्रदर्शनाच्या वेळांची विभागणी केली जाईल.

तसेच तिकिट बुकिंग पेक्षा ऑनलाईन बुकिंगला जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्यामुळे लोकांनी संपर्कात येण्याचे टाळता येईल. तरीही तिकीट खिडकीवर तिकीट विक्री चालू राहील आणि विक्री काउंटरवर गर्दी होऊ नये म्हणून आगाऊ बुकिंग करण्यासाठीही परवानगी देण्यात येईल.