Chandrayaan 3 Mission. (Photo Credits: Twitter@ISRO)

भारतीय अवकाश संशोधन संस्थेसाठी (ISRO) 23 ऑगस्ट हा दिवस ऐतिहासिक ठरला. गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती तो क्षण अखेर आला आणि चांद्रयान-3 (Chandrayaan-3) पासून वेगळे झालेले लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे उतरले. आज, 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.05 वाजता चांद्रयानचे सॉफ्ट लँडिंग झाले. इस्रोचे बंगळुरू स्थित इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क (ISTRAC) चांद्रयानचा वेग, आरोग्य आणि दिशा यावर सतत लक्ष ठेवत होते. चंद्रावर लँडर उतरवण्याआधी, इस्रोने ते डीबूस्ट करण्याची प्रक्रिया पार पाडली. यामध्ये लँडर मॉड्यूलचा वेग कमी करण्यात आला. यानंतर 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी त्याचे सॉफ्ट लँडिंग झाले.

या लँडर मॉड्यूलच्या सॉफ्ट लँडिंगनंतर रोव्हर प्रज्ञान लँडर विक्रममधून बाहेर काढला जाईल. हा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल आणि पुढील काम सुरू होईल. चंद्राच्या पृष्ठभागावर हा रोव्हर तेथे एक चंद्र दिवस घालवेल. चंद्राचा दिवस हा पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो. हा रोव्हर इस्रोसाठी चंद्रावर अनेक वैज्ञानिक प्रयोग करणार आहे, ज्यामुळे चंद्रावर असलेली अनेक खोल रहस्ये उघड होऊ शकतात. या लँडिंगनंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.

चांद्रयान-3 ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) तिसरी चंद्र शोध मोहीम आहे. चांद्रयान-3 च्या लँडिंगनंतर, चंद्रावर रोव्हर तैनात करण्याची आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास करण्याची योजना आहे. इस्रोने 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून चांद्रयान प्रक्षेपित केले व 41 व्या दिवसानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंगचे नियोजन करण्यात आले. भारताने आपल्या हेवी लिफ्ट लॉन्च व्हेईकल LVM3-M4 वरून चांद्रयान प्रक्षेपित केले आहे. चंद्रावर 14 दिवस रात्र आणि 14 दिवस प्रकाश असतो. जेव्हा येथे रात्र असते तेव्हा तापमान -100 अंश सेल्सिअसच्या खाली जाते. चांद्रयानचे लँडर आणि रोव्हर त्यांच्या सोलर पॅनलमधून ऊर्जा निर्माण करतील. त्यामुळे ते 14 दिवस वीजनिर्मिती करतील, पण वीजनिर्मितीची प्रक्रिया रात्री थांबेल. (हेही वाचा: Russia's Mission Luna-25 Crashed: रशियाची चंद्र मोहीम अयशस्वी; Luna-25 चंद्रावर कोसळले)

चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगमुळे भारताला तीन मोठे फायदे होतील. पहिला फायदा म्हणजे अंतराळ शर्यतीत भारत खूप पुढे जाईल. दुसरे म्हणजे, इस्रोवरील जगाचा विश्वास वाढेल, त्याचप्रमाणे अवकाश क्षेत्रातील गुंतवणूकही फायदेशीर ठरेल. दरम्यान, चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगसाठी बुधवारी सकाळी उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात विशेष भस्म आरती करण्यात आली. बुधवारी लखनौमधील इस्लामिक सेंटर ऑफ इंडियामध्ये चांद्रयान-3 च्या यशासाठी लोकांनी नमाज अदा केली.