Covid 19 In India: आयुष मंत्रालयाकडून कोविड-19 विषयक आयुर्वेद, युनानी उपचारपद्धतीबाबतची नवी नियमावली जारी
ministry of ayush logo

देशात कोविड महामारीची दुसरी लाट आल्याच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शन सूचना जारी करण्याची गरज निर्माण झाली आहे. हे लक्षात घेऊन, आयुष मंत्रालयाने (Ayush Ministry) आयुर्वेद (Ayurveda) आणि युनानी (Unani) उपचार करणाऱ्यांसाठी तसेच, गृह अलगीकरणात असलेल्या कोविड रुग्णांसाठी वैयक्तिक आयुर्वेद आणि युनानी प्रतिबंधात्मक उपचारपद्धतीबाबत नवी सुधारित नियमावली जारी केली आहे. यात वैयक्तिक काळजी आणि गृह अलगीकरणात असलेल्यांचे उपचार व्यवस्थापन यावर भर देण्यात आला आहे. सध्या मोठ्या प्रमणात कोविडग्रस्त कुटुंबे रुग्णालयांऐवजी घरातच या आजाराशी सामना करत असल्याने, त्यांच्या उपचारांकडे लक्ष देण्यात आले आहे.

गृह-अलगीकरणात असलेल्या कोविड रुग्णांसाठी तसेच प्रतिबंधात्मक उपायांद्वारे वैयक्तिक काळजी घेण्यासाठीचे उपचार पारंपरिक आयुर्वेदिक आणि युनानी चिकित्सा पद्धतींवर आधारलेली आहे. यात विविध रूग्णांवरील संशोधन,आंतरशाखीय समितीने दिलेला अहवाल आणि केलेल्या शिफारसी यांच्या आधारावर सुधारित नियमावली तयार करण्यात आली आहे. या नव्या मार्गदर्शक सूचनांमुळे कोविड-19 मुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीशी लढा देणे सोपे जाणार आहे. Prone Position Breathing म्हणजे काय? गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल?

सध्याच्या या मार्गदर्शक सूचना आणि वैयक्तिक उपाययोजनांमधून आयुर्वेद आणि युनानी उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही कोविड रूग्णांवर संसर्गाच्या विविध टप्प्यांमध्ये उपचार करण्याविषयी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

आयुष मंत्रालयाने कोविड पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी, 29 जानेवारी 2020 रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. याच संदर्भात, आयुष मंत्रालयाने ‘आयुषक्वाथ’ (आयुर्वेदिक) या प्रतिबंधात्मक काढ्याचा वापर करण्याची शिफारस देखील केली आहे. या काढ्यात, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तसेच विषाणूरोधी तत्वांसाठी भारतात आणि परदेशातही लोकप्रिय असलेल्या चार वनौषधींचा समावेश आहे. त्याशिवायही हा काढा आरोग्यासाठी लाभदायक आहे. ऋतुमानानुसार होणारे बदल आणि रुग्णाची शारीरिक घडण लक्षात घेत, गरजेनुसार या क्वाथ मध्ये वासा (मलबार बी) , ज्येष्ठमध आणि गुग्गुळ यांचा समावेश करावा,असा वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे.

सध्याच्या काळात कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोर मोठेच आव्हान निर्माण जाहले आहे. त्यामुळे, आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांसाठी,गृह अलगीकरणात असलेल्या कोविड-19 रूग्णांची काळजी आणि व्यवस्थापनाबाबतच्या माहितीचा जलद प्रसार होणे अत्यंत आवश्यक आहे.

आयुष मंत्रालयच्या संकेतस्थळावर या मार्गदर्शक सूचना उपलब्ध आहेत. त्याशिवाय, आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इतर उपचार पद्धतींबाबतच्या मार्गदर्शक सूचना देखील, लवकरच जारी होणे अपेक्षित आहेत.