Avian Flu Outbreak In Ranchi: रांचीच्या पोल्ट्री फार्ममध्ये पुन्हा एकदा बर्ड फ्लूचा उद्रेक; 2,196 पक्ष्यांना केले नष्ट
Chicken (Photo Credits: Pixabay)

Avian Flu Outbreak In Ranchi: झारखंडची राजधानी रांचीमध्ये (Ranchi) पुन्हा एकदा एव्हियन फ्लूचा कहर (Avian Flu Outbreak) समोर आला आहे. या प्रकरणी विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी (22 मे) रांची येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूची प्रकरणे आढळल्यानंतर झारखंड सरकारने अलर्ट जारी केला आहे. वृत्तसंस्था पीटीआय-भाषाने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, मोऱ्हाबादी येथील राम कृष्ण आश्रमाद्वारे चालवल्या जाणाऱ्या दिव्यायन कृषी विज्ञान केंद्र या पोल्ट्री फार्ममध्ये 770 बदकांसह 920 पक्षी मारले गेले.

आतापर्यंत 2196 पक्षी दगावल्याची नोंद आहे. एकूण 4 हजार 300 अंडीही नष्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विभागीय अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, भोपाळमधील आयसीएआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीजेस (NIHSAD) ला पाठवलेल्या नमुन्यांमध्ये H5N1 ची पुष्टी झाली आहे. H5N1 हा एव्हीयन इन्फ्लूएंझा ए व्हायरसचा एक प्रकार आहे. (हेही वाचा: Microplastics Detected In Human Testicles: पुरूषांच्या अंडकोषांमध्ये आढळले मायक्रोप्लास्टिक्स; प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो परिणाम, अभ्यासात धक्कादायक खुलासा)

एप्रिल 2024 च्या चौथ्या आठवड्यातही रांचीमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्याची पुष्टी विभागीय अधिकाऱ्यांनी केली होती. त्यावेळी रांचीच्या होटवार भागात असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या प्रादेशिक पोल्ट्री फार्मच्या कोंबड्यांचे नमुने, भोपाळ येथील सरकारी प्रयोगशाळेत तपासण्यात आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. बर्ड फ्लूची साथ पसरल्यानंतर जिल्हा प्रशासनाने अलर्ट जारी केला होता. त्यावेळी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कोंबडी व संबंधित उत्पादनांच्या खरेदी-विक्रीवर बंदी घातली होती. त्यावेळीही हजारो कोंबड्या मारल्या गेल्या आणि अंडी नष्ट केली गेली.

एव्हियन बर्ड फ्लू म्हणजे काय?

एव्हियन इन्फ्लूएंझा सामान्यतः ‘बर्ड फ्लू’ म्हणून ओळखला जातो. हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे, जो पक्ष्यांमध्ये पसरतो, परंतु कधीकधी मानवांमध्ये देखील पसरतो. इन्फ्लुएंझा A (H5N1) मुळे मानवांमध्ये श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात. या संसर्गाचा कुक्कुटपालन, पाणपक्षी- हंस आणि बदके आणि पशुधन यांच्याशी संबंधित लोक यांना सर्वाधिक धोका असतो. दरम्यान, अमेरिकेच्या मिशिगन येथे गायींमधील सध्याच्या H5N1 च्या प्रादुर्भावाशी संबंधित बर्ड फ्लूच्या संसर्गाची दुसरी मानवी घटना आढळून आली आहे. या ठिकाणी एका फार्म वर्करला संक्रमित गायींमधून H5N1 चा संसर्ग झाला होता.