चिंताजनक! आर्थिक अडचणी आणि इतर कारणांमुळे शहरातील 48 तर ग्रामीण भागातील 62 टक्के वृद्ध डॉक्टरांकडे जात नाहीत; Agewell च्या सर्वेक्षणात खुलासा
Old Age Representational Image (Photo Credits: Pixabay)

भारतात वृद्धांशी (Elderly People) संबंधित एक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात मोठी चिंताजनक बाब समोर आली आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या शहरी भागातील 48.6 टक्के वृद्ध लोकांनी सांगितले की, आर्थिक अडचणींमुळे आणि लॉजिस्टिक आव्हानांमुळे ते नियमित डॉक्टरांकडे जाऊ शकत नाहीत. ग्रामीण भागात हा आकडा 63 टक्क्यांहून अधिक आहे. एनजीओ एजवेलने (NGO Agewell) हे सर्वेक्षण केले असून, यामध्ये 10 हजार लोकांचा सहभाग होता.

एजन्सीनुसार, आग्रा येथील 78 वर्षीय प्रभाकर शर्मा एक दशकापासून संधिवाताने त्रस्त आहेत. नियमित तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये जाणे त्यांना वेदनादायक आणि कठीण वाटते. आवश्यक वैद्यकीय चाचण्यांसाठी ते अनेकदा प्रवास टाळतात. ‘जर घरोघरी किंवा फिरती आरोग्य तपासणी सेवा असती तर ते खूप उपयुक्त ठरले असते’, असे ते म्हणतात.

लुधियानामधील 72 वर्षीय राजेश कुमार यांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागत आहे. ते म्हणतात, आरोग्य सेवांचा उच्च खर्च त्यांना परवडणारा नाही. ते सध्या पूर्णपणे निवृत्तीनंतरच्या पेन्शनवर अवलंबून आहेत. आपल्याकडे काही मेडिक्लेम पॉलिसी असती तर कदाचित आपण अधिक चांगल्या वैद्यकीय सेवा घेऊ शकलो असतो, असे ते म्हणतात. या अभ्यासात भारतातील वृद्धांना भेडसावणाऱ्या समस्यांचा सर्वसमावेशक दृष्टिकोन घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (हेही वाचा: Ultra Processed Foods: अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्सचे सेवन करणे ठरू शकते मृत्यूचे कारण; हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात मोठा खुलासा)

अभ्यासात म्हटले आहे की, शहरी भागातील 36.1 टक्के वृद्धांनी असा दावा केला आहे की ते फक्त गरजेच्या वेळीच हॉस्पिटल आणि डॉक्टरांकडे जातात. सर्वेक्षणादरम्यान, 38.5 टक्क्यांहून अधिक वृद्धांनी दावा केला की त्यांची सध्याची आरोग्य स्थिती खराब आहे किंवा खूप वाईट आहे. 23.4 टक्के लोकांनी सांगितले की त्यांची सध्याची आरोग्य स्थिती सरासरी म्हणता येईल. या अभ्यासात असे म्हटले आहे की, सर्वेक्षण केलेल्या 54.6 टक्के वृद्ध लोकांची एकूण आर्थिक स्थिती खराब किंवा खूप वाईट होती, तर 23.3 टक्के वृद्धांनी असा दावा केला की त्यांची आर्थिक स्थिती सरासरीपेक्षा थोडी जास्त आहे. सर्वेक्षणातील 24 टक्के लोकांनी ते एकटे राहत असल्याचे सांगितले.