Zika Virus In Kerala: केरळ मध्ये गर्भवती महिला झिका संक्रमित; जाणून घ्या या डासांमुळे पसरणार्‍या या आजाराची लक्षण, उपचार
झिका व्हायरस (Photo Credit: PTI)

भारतामध्ये एकीकडे कोरोना संसर्गाला (Coronavirus) आटोक्यात ठेवण्यासाठी सारेच प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना आता केरळ मध्ये 13 गर्भवती महिलांना डासांमुळे पसरणार्‍या झिका वायरसची (Zika Virus) लागण झाल्याचं समोर आलं आहे. केरळच्या तिरूअंनतपुरम मधून हे सारे सॅम्पल पुण्याच्या एनआयवीमध्ये (NIV Pune) तपासणीसाठी पाठवले होते आणि रे सारे पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान मागील महिन्यात एका 24 वर्षीय गर्भवतीला झिकाची लागण झाल्यानंतर तिच्यावर उपचार झाले होते त्यानंतर इतर ठिकाणी तपास केल्यानंतर या 13 केसेस समोर आल्या आहेत.मातृभूमी या न्यूज पोर्टलच्या माहितीनुसार या महिलेला ताप, डोकेदुखी, त्वचेवर लाल चट्टे अशी लक्षणं होती.

सामान्यपणे झिका वायरस हा डासांमधील संक्रमित Aedes species द्वारा पसरतो. हा डास प्रामुख्याने दिवसा चावतो. Aedes species द्वारा डेंगी, चिकनगुनिया आणि यलो फीवर देखील पसरतो. झिका वायरस गर्भवती महिलांमधील तिच्या बाळाला जातो. यामुळे बाळ सदोष जन्माला येऊ शकतं. यासोबतच मिसकॅरेज, प्रीमॅच्युअर डिलेव्हरी यांचा देखील धोका असतो. US Centers for Disease Control and Prevention (CDC)च्या माहितीनुसार ज्यांना झिका वायरसची लागण असेल ते आपल्या सेक्स पार्टनरला देखील संक्रमित करू शकतात. हेदेखील वाचा- Monsoon Tips: पावसाळ्यात डासांचा त्रास दूर करण्यासाठी घरात ही 5 झाडं लावणं ठरेल फायदेशीर.

झिका वायरस संक्रमणाची लक्षणं

डासांद्वारा पसरणारा हा झिका वायरसचा धोका असल्यास ताप, रॅश, डोळे येणं, स्नायू दुखी, सांधेदुखी, डोकेदुखीचा त्रास जाणवतो. दरम्यान झिका वायरसच्या संसर्गानंतर त्याचा शरीरात प्रवेश झाल्यानंतर प्रत्यक्ष रोगाला निर्माण होण्याचा काळ हा 3-14 दिवस आहे. तर लक्षणं 2-7 दिवस राहू शकतात.WHO च्या माहितीनुसार अनेकांना झिका वायरसची लागण झाली तरी लक्षणं दिसत नाहीत.

झिका वायरसपासून बचावासाठी काय कराल?

अद्याप झिका वायरस संसर्गावर उपचार किंवा इंजेक्शन नाही. UN health agency चा सल्ला आहे की ज्यांना लक्षणं आढळतील त्यांनी पुरेसा आराम करावा, शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य राखावं, वेदना आणि ताप दोन्हींना सामान्य औषधांच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करावा. झिका वायरस संसर्ग रोखण्यासाठी सध्या केवळ डासांना दूर ठेवणं इतकाच आहे. शक्यतो गरोदर महिला, आई होण्याच्या वयातील मुली, स्त्रिया आणि लहान मुलांकडे विशेष लक्ष देणं गरजेचे आहे.

टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याला पर्याय नाही. अचूक निदानासाठी डॉक्टरांचा सल्ला वेळीच घेणे आवश्यक आहे.