Monkeypox Virus: आफ्रिकन देशांमध्ये सध्या मंकीपॉक्स संसर्गाने(Monkeypox Virus) धुमाकूळ घातला आहे. एका देशातून दुसऱ्या देशात याच्या संसर्गाची वाढती प्रकरणे नोंदवली जात आहेत. आफ्रिकन देशांमध्ये, विशेषत: काँगोमध्ये याच्या संसर्गाच्या वाढीनंतर आता त्याचा परिणाम इतर देशांवरही होताना दिसत आहे. काँगोसह 13 आफ्रिकन देशांमध्ये वेगाने पसरत आहे. या आजारामुळे आतापर्यंत 524 लोकांचा मृत्यू झाला आहे. मंकीपॉक्स संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मंकीपॉक्स संसर्ग पाकिस्तानमध्येही दाखल झाला आहे.(Monkeypox Cases: काँगोसह आफ्रिकन देशांमध्ये Mpox चा धोका वाढला, WHO ने जागतिक आरोग्य आणीबाणी केली जाहीर)
भारताच्या वेशीवर हा संसर्ग आल्याने भारतातही प्रतिबंधात्मक पावले उचलली जात आहेत. तामिळनाडूच्या सार्वजनिक आरोग्य संचालनालयाने विमानतळ आणि समुद्री बंदर अधिकाऱ्यांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्वीडनमध्येही या संसर्गजन्य रोगाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आरोग्य तज्ज्ञांनी या वाढत्या धोक्याबाबत सर्व लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तामिळनाडूच्या सार्वजनिक आरोग्य संचालनालयाने (DPH) विमानतळ आणि समुद्री बंदर अधिकाऱ्यांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मंकीपॉक्स संसर्गासाठी पॉझिटिव्ह आढळलेल्या बहुतेक रुग्णांची हिस्ट्री, म्हणजेच ते लोक अलीकडे कोणत्या देशांमध्ये प्रवास करून आले आहेत. तेथे हा संसर्ग वेगाने वाढत आहे का? याची सखोल तपासनी करण्याचे आदेश दिले आहेत. चेन्नई, मदुराई आणि कोईम्बतूर येथील आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य संचालक टी.एस. सेल्वविनायगम यांनी mpox च्या जोखमींबद्दल सतर्क केले आहे. बाधित देशांतून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करण्याच्या आणि गेल्या 21 दिवसांच्या प्रवासाची माहिती गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
2022 मध्ये पहिल्यांदाच भारतात संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली होती. 2022 पासून देशात विषाणू संसर्गाची 30 प्रकरणे नोंदली गेली आहेत. सध्या भारतात मंकीपॉक्स संसर्गाचा धोका खूपच कमी आहे. हा संसर्गजन्य विषाणू असल्याने आणि शेजारच्या देशांत पोहोचला असल्याने अगोदरच सतर्क राहणे गरजेचे आहे.