विवाहित मुलीलाही मिळू शकते आई-वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर नोकरी - उच्च न्यायालय
Court Hammer | (Photo Credits-File Photo)

नोकरीच्या कालावधीत सरकारी नोकरीवर तैनात असलेल्या आई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यास एक विवाहित मुलगी अनुकंपा नियुक्तीसाठी (Compassionate Basis) पात्र असेल. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने सोमवारी एका खटल्याची सुनावणी करताना हा आदेश दिला. कोर्टाने मुलींच्या बाजूने निकाल देताना म्हटलं आहे की, जर विवाहित मुलगा अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र असेल, तर मुलगी का नाही? आई किंवा वडिलांच्या निधनानंतर जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचा बेरोजगार मुलगा नसेल, तर त्यांची मुलगीदेखील अर्ज करू शकते. मुलगी विवाहित आहे की, नाही याचा फरक पडत नाही. एक विवाहित मुलीला सहसा अनुकंपा नोकरी वगळली जाते. मात्र, भविष्यात अनुकंपा नोकरी प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयाचा हा निर्णय अग्रणी ठरू शकतो.

सतना जिल्ह्यातील निवासी प्रीती सिंग नावाच्या महिलेने यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीवर जबलपूर हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. प्रीती सिंग यांच्या वकिलांच्या वतीने असा युक्तिवाद केला होता की, 2014 मध्ये कोळीगंवा पोलिस ठाण्यात त्याची आई मोहिनी सिंग ASI म्हणून तैनात असताना एका रस्ता अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रीतीसिंग यांनी आईच्या ठिकाणी अनुकंपा नेमणुकीसाठी अर्ज केला. परंतु, प्रीती सिंग विवाहित असल्याच कारण देत भोपाळ पोलिस मुख्यालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता. (वाचा - Supreme Court: सासरी पत्नीला झालेल्या दुखापत किंवा मारहाणीसाठी पती जबाबदार- सर्वोच्च न्यायालय)

या प्रकरणात प्रीती सिंग यांनी जनहित याचिका दाखल केली होती. न्यायाधीश संजय द्विवेदी यांच्यासमोर झालेल्या खटल्याच्या सुनावणीत वकिलांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 ने देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार दिला आहे. तर मग अनुकंपा नियुक्तीमध्ये असा भेदभाव का होतो? विवाहित मुलाला अनुकंपा नियुक्ती मिळू शकते, तर विवाहित मुलीला अनुकंपा नियुक्ती का नाही? यावर कोर्टाने याचिकांचे समर्थन केले आणि त्यांना अनुकंपा नियुक्ती देण्याचे आदेश दिले.

याचिकाकर्त्याला विवाहित असूनही अनुकंपा नियुक्ती देण्यात यावी, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. हा आदेश अनेक मुलींसाठी दिलासा देणारा आहे.