जालियनवाला बाग हत्याकांडाला 100 वर्षे पूर्ण; राहुल गांधी, पीएम नरेंद्र मोदी यांनी वाहिली शहिदांना श्रद्धांजली
The Jallianwala Bagh | File Image | (Photo Credits: Wikimedia Commons)

13 एप्रिल 1919, संपूर्ण भारताला हादरवणारा जालियनवाला बाग हत्याकांड (Jallianwala Bagh Massacre) दिवस. जनरल डायरच्या आदेशाने झालेल्या अमानुष गोळीबारात अनेक लोक शहीद झाले होते. आज या घटनेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने याठिकाणी या हत्याकांडातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीसुद्धा अमृतसमध्ये दाखल झाले आहेत. राहुल गांधी यांनी सकाळी आठ वाजता शहीदांना श्रद्धांजली वाहिली. या घटनेला 100 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने शहिदांची आठवण म्हणून नाणे आणि पोस्ट जारी करण्यात येणार आहे.

13 आणि 14 एप्रिल रोजी पंजाबमध्ये बैसाखीचा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. 1919 सालीही या दिवशी अनेक शीख बांधव हा सण साजरा करण्यासाठी जालियनवाला बागेत जमले होते. त्याचवेळी सत्यपाल व सैफुद्दीन किचलूच्या अटकेचा लोकांनी शांततापूर्वक निषेध केला. जमावबंदीचा आदेश असतानाही हे लोक एकत्र जमले आहेत हे पाहुन या जमावावर जनरल डायर आणि त्याच्यासोबत असणार्‍या 90 ब्रिटिश सैनिकांनी 10 ते 15 मिनिटांत बंदुकीच्या 1650 फैरी झाडल्या. अंदाधुंद गोळीबार सुरू झाल्याने अनेक जण यामध्ये शहीद झाले; तर जीव मुठीत घेऊन बचावासाठी धावाधाव सुरू झाल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत काही जण जखमी झाले. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी बागेतील खोल विहिरीत उड्या मारल्या.

अमृतसर येथील ब्रिटिश कमिशनरच्या नोंदीनुसार या घटनेमध्ये 484 जण शहीद झाले. त्यापैकी 388 शहिदांची यादी या बागेत आजही आपणास पाहावयास मिळते. प्रत्यक्षात मात्र  यात हजारो व्यक्ती शहीद झाल्या. या घटनेचा  धक्का सगळ्यांनाच बसला होता. प्रत्येक भारतीयाने या घटनेचा निषेध  केला. या घटनेच्या निषेधार्थ रवीन्द्रनाथ टागोरांनी त्यांचा  'सर' किताब ब्रिटिशांना परत केला. पुढे या घटनेची चौकशी करण्यासाठी हंटर कमीशन नेमण्यात आले. यामध्ये डायर दोषी मानला गेला व त्याला सेवामुक्त करण्यात आले. या घटनेनंतर काँग्रेसने स्वातंत्र्याची चळवळ जोरात सुरू केली. असहकार आंदोलन, संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी, छोडो भारत चळवळ अशा मार्गांनी स्वातंत्र्य मागितले गेले. (हेही वाचा: पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली म्हणून तरूणाने पाठीवर गोंदवला तिरंगा आणि 71 शहिदांची नावं)

1997 मध्ये इंग्लंडची राणी महाराणी एलिझाबेथ भारतदौऱ्यावर आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी या हत्याकांडात शहीद झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली. पुढे 2013 मध्ये इंग्लंडचे प्रंतप्रधान डेव्हिड कॅमेरून ज्यावेळी भारतभेटीवर आले होते त्यावेळी त्यांनी जालियनवाला बागेला भेट दिली होती, व ही घटना म्हणजे ब्रिटिश इतिहासातील लज्जास्पद घटना असल्याचे वक्तव्य केले होते.