ISRO Chief S. Somnath On Cyber Attacks: देशभरात सायबर क्राईम (Cyber Crime) च्या अनेक घटना घडतात. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) चे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सायबर क्राईम संदर्भात अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. देशाच्या अंतराळ संस्थेवर दररोज 100 हून अधिक सायबर हल्ले होत असल्याचं सोमनाथ यांनी म्हटलं आहे. केरळमध्ये आंतरराष्ट्रीय सायबर परिषदेची 16 वी आवृत्ती पार पडली. कोचीमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या समारोपाच्या सत्रात सोमनाथ म्हणाले की, रॉकेट तंत्रज्ञानामध्ये सायबर हल्ल्याची शक्यता खूप जास्त आहे. सायबर आरोपी अत्याधुनिक सॉफ्टवेअर आणि चिप्स वापरतात. मात्र, इस्रो अशा हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सज्ज आहे. आम्ही मजबूत सायबर सुरक्षा नेटवर्कने सुसज्ज आहोत. रॉकेटमधील हार्डवेअर चिप्सच्या सुरक्षिततेवर इस्रो लक्ष केंद्रित करत आहे. त्यासाठी विविध चाचण्या घेण्यात येत आहेत.
एस सोमनाथ पुढे बोलताना म्हणाले की, येत्या 20 ते 25 वर्षांत भारत स्वतःचे अंतराळ स्थानक स्थापन करू शकतो. गगनयान मोहिमेमुळे भारताला अंतराळात मानव पाठवण्याची क्षमता मिळेल. या यशानंतर इस्रो स्पेस स्टेशन बांधण्यावर अधिक भर देणार आहे. भारताचे स्वतःचे स्पेस स्टेशन असावे अशी इस्रोची योजना आहे. सोमनाथ यांच्या म्हणण्यानुसार, त्याचे बांधकाम पुढील 20 ते 25 वर्षांत वेगवेगळ्या टप्प्यात पूर्ण केले जाईल. सुरुवातीला ते रोबोट ऑपरेट केले जाईल. एकदा मानवाला अवकाशात पाठवण्याची अधिक चांगली क्षमता प्राप्त झाल्यानंतर ती मानवाकडून चालवली जाईल. त्यानंतर अंतराळवीरही येथे राहतील. (हेही वाचा - Chandrayaan 3 Mission Update: ‘विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरकडून कोणतेही सिग्नल मिळालेले नाहीत,’ प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याची ISRO ची माहिती)
दरम्यान, गगनयान आणि इतर मोहिमांच्या माध्यमातून मानवाला अंतराळात पाठवून दीर्घकाळ अंतराळात ठेवण्याची क्षमता साध्य केली जाणार आहे. सोमनाथ म्हणाले की, भारतीय अंतराळ स्थानक आपल्या अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर असावे की नाही यावर इस्रो चर्चा करत आहे. चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर इस्रोकडून अपेक्षा वाढल्या आहेत. या कारणास्तव, गगनयानवर काम केले जात आहे. भविष्यासाठी, प्रगत चंद्र मोहिमांवर देखील कार्य केले जात आहे, अंतराळाबद्दल चांगली माहिती मिळवणे आणि नवीन तंत्रज्ञानाचा प्रयत्न करणे, हे त्यामागील उद्दिष्ट आहे.
सोमनाथ यांनी पुढे सांगितलं की, भारतीयांना अंतराळ आणि शोध मोहिमांमध्ये खूप रस आहे, ते या क्षेत्रात सुरू असलेल्या कामाच्या तपशीलांवर लक्ष ठेवतात. चांद्रयान-3 ने देशात वैज्ञानिक चैतन्य पसरवले. खगोलशास्त्राच्या क्षेत्रात तरुण वर्ग उत्साहाने येत आहे. यामुळे खगोलशास्त्रासाठी एक मोठा टॅलेंट पूल तयार करण्यात मदत होईल, जे आमचे कार्य पुढे नेतील. चांद्रयान-3 च्या यशाने संपूर्ण देश उत्साहात आहे.